चेन्नई एक्स्प्रेसची घोडदौड प्ले-ऑफच्या दिशेने!

0
369
AppleMark

पुणे : धोनीसारखा कसलेला कर्णधार लाभलेल्या चेन्नई एक्स्प्रेसने शनिवारी आरसीबीचा ६ गडी राखून धुव्वा उडवला आणि आयपीएल हंगामातील प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याच्या दिशेने जोरदार आगेकूच कायम राखली. प्रारंभी, आरसीबीला निर्धारित २० षटकात ९ बाद १२७ अशा किरकोळ धावसंख्येवर रोखल्यानंतर चेन्नईने १८ षटकात ४ गडय़ांच्या बदल्यातच विजयाचे लक्ष्य गाठले. १८ धावात ३ बळी घेणारा रवींद्र जडेजा सामनावीर ठरला. त्याला हरभजनची (२२ धावात २ बळी) समयोचित साथ लाभली. जडेजा व हरभजनच्या भेदक गोलंदाजीमुळे आरसीबीला ९ बाद १२७ धावांवर समाधान मानावे लागले, त्याचवेळी या लढतीचा निकाल जवळपास निश्चित झाला. आरसीबीतर्फे पार्थिव पटेल (४१ चेंडूत ५३) व टीम साऊदी (२६ चेंडूत ३६) या दोघाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. विजयासाठी १२८ धावांचे माफक आव्हान असताना, महेंद्रसिंग धोनीने (२३ चेंडूत नाबाद ३१) यजुवेंद्र चहलला ‘स्पेशल ट्रीटमेंट’ देताना ३ उत्तूंग षटकार खेचले. या विजयासह चेन्नईच्या खात्यावर १० सामन्यात १४ गुण झाले असून त्यांचा प्ले-ऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. उर्वरित ४ सामन्यात आता केवळ एक विजय देखील त्यांच्यासाठी पुरेसा ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here