शरद पवारानंतर आता काँग्रेसही नाराज ; उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर तीव्र आक्षेप

0
894

नवी दिल्ली  : दि २० : ‘एल्गार’ परिषदेचा तपास एनआयएला देण्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर आता काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त केलीय. राज्यात एनपीआर लागू करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुकूल आहेत. मात्र काँग्रेसने त्याला विरोध केलाय. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याला तीव्र आक्षेप घेत ठाकरेंना महा आघाडीची  आठवण करून दिलीय.खरगे म्हणाले, हे तीन पक्षांचं सरकार आहे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यावं. NPR लागू करायला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांची भूमिका लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. एकतर्फी निर्णय चालणार नाही. महत्त्वाचे निर्णय तिनही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीतच घेतले जावे असंही त्यांनी म्हटलंय.तर NPRवर उद्धव ठाकरे यांनी सर्व पैलुंचा विचार करत निर्णय घेतला. त्यावर फेरविचार होणार नाही असं शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगितलं जातंय. या आधी ‘एल्गार’ परिषदेचा तपास NIAला देण्यावरून त्यांच्यात मतभेद झाले होते. राष्ट्रवादीने त्याला विरोध केला होता. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या अधिकारात निर्णय घेतला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.