दोडामार्गात अनेक गावांनी केली गावबंदी ; साटेली – भेडशी गावांनीही सीमा केल्या बंद

0
422

दोडामार्ग, दि. २६ : अवघा देश लॉकडाऊन झाल्यानंतर कोरोना विषाणूची दाहकता प्रचंड प्रमाणात नागरिकांच्या मनात दहशत माजवून गेली आहे. त्यामुळं कोरोना गावाच्या वेशीबाहेरच राहावा, यासाठी दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांनी पुढाकार घेत गावाबाहेरील लोकांना प्रवेश बंदी केली आहे. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या साटेली – भेडशी ग्रामपंचायतनेही गावबंदीसारखा कठोर निर्णय घेऊन बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. संपूर्ण भारत देश मंगळवारी रात्रीपासून लॉकडाऊन झाला आणि एवढे दिवस कोरोना प्रतिबंधासाठी राबणारे प्रशासन जिल्हाबंदी, संचारबंदीसाठी का मेहनत घेत होते याबाबत आता गावे सजग झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील ग्रामीण असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील खेड्यापाड्यातील गावेसुद्धा कोरोना बाबतीत कमालीची खबरदारी घेत आहेत. पुण्या मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आले असले तरी अद्याप सिंधुदुर्ग यापासून बचावला आहे. त्यामुळं काही झालं तरी कोरोना ला गावाबाहेरच ठेवायचं यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीनी आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून थेट गावबंदीचीच अमंलबजावणी सुरू केली आहे. प्रशासनाने आंतरजिल्हा बंदी प्रवेश केला होता. मात्र आता गावकरिच आपल्या लोकांसाठी थेट गांवबंदी निर्णय घेत असून त्यासाठी झटत असल्याने ही एक कोरोनाला रोखण्यासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. तालुक्यातील साटेली भेडशी, झरे १, कुडासे खुर्द, मांगेली अशा अनेक ग्रामपंचायतीच्या गावच्या वेशी नागरिक व ग्रामपंचायत यांनी पूर्णतः वाहतुकीस सील केलेल्या आहेत. साटेली भेडशी ग्रामपंचायतने तालुक्यातील दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावरच स्वतः गेट कार्यान्वित केल्या आहेत. शिवाय आठवडा बाजार बंद करून मंगळवार, गुरुवार व शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेतच नागरिकांना फक्त जीवनावश्यक गोष्टींसाठी बाजारपेठ खुली ठेवली जाणार आहे. या निर्णयाच्या अमंलबजावणी साठी ग्रामपंचायतचे सरपंच लखु खरवत यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व सदस्य, गावकरी व युवा मंडळी मेहनत घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.