मी मोती तलाव बोलतोय..!

0
587

स्पेशल रिपोर्ट, दि. ०३ : नमस्कार, मी तुमचा सर्वाचा, हो सर्वांचाच मोती तलाव… निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सावंतवाडी शहराच मी हृद्य आहे. मी आहे सावंतवाडीच्या संस्थानकालीन घडामोडींचा साक्षीदार.. कविवर्य केशवसूत, डॉ. वसंत सावंत अशा साहित्यिकांच्या अजरामर कविता देखील त्यांनी माझ्याच काठावर बसून शब्दात उतरल्यात. आजवर अनेक संकटं, अनेक प्रसंग मी अनुभवलेत.  आज जगासमोर कोरोनाच भयानक संकट उभं ठाकलय. सरकारनं लॉकडाऊन केल्यामुळ जनजीवन ठप्प झालंय. त्यामुळे अगदी पहाटेपासून रात्रीपर्यंत गजबजणारा मी, आज मात्र सुनासुना झालोय. पहाटे मॉर्निंग वॉकला अनेक लोकं माझ्या काठावर येतात.  योगा करतात. थकल्या, दमल्यावर माझ्याच काठावर बसून …एकमेकांचं सुखदुःख वाटून घेतात…एकमेकांना आधार देतात..कलाकार, छायाचित्रकार पहाटेचा हा सोनेरी नजारा टिपण्यासाठी, आपल्या कुंचल्यातून साकारण्यासाठी येतात. कवी, साहित्यीकांना नव्या कल्पना याचं एकांतात सुचतात. सायंकाळी वयोवृद्ध नागरिक, महिला यांच्या गप्पांची जणू मैफलच माझ्या काठावर भरते. एखादी वाऱ्याची झुळूक आली की मीही या मैफलीत सहभागी होतो. केशवसुत कटट्यावर  संपूर्ण दिवसभराच्या कामाचा शीण घालवण्यासाठी सर्वच स्तरातले लोक येतात, गप्पा रंगतात. माझी एवढी सवय या लोकांना झालीय की माझ्याकडे आल्याशिवाय त्यांना करमत नाही आणि हा…विशेष म्हणजे मित्र-मैत्रिणीच्या एकत्र येण्याचा, प्रेमी युगालांच्या प्रेमकहाणीचा, मनाचे धागे जुळण्याचा दुवा मीच आहे बर का..! ..निराधार असलेल्या बेघरांचा आधारही मीच आहे. आज कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग ठप्प आहे. माझही हे नंदनवन या कोरोनान हिरावून घेतलय. याच दुख: तर मला आहेच. पण पण तुमची काळजी त्याहून अधिक आहे. सरकार तुमच्या भल्यासाठी अहोरात्र राबतय, तुम्हाला बाहेर न पडण्याची सूचना करतंय. मात्र, त्याच पालन न करता तुम्ही अजूनही माझ्या काठावर येता, याच दुख: वाटत.  या महामारीच संकट दुर करायला अनेक जण जीवाची बाजी लाऊन काम करतायत. तुम्हाला तर घरातच राहायचं आहे ना…आणि ते दुसऱ्या कोणासाठी नाही तर तुमच्या हितासाठीच..त्यामुळे थोडी कळ सोसा.. आणि हो.. एक गोष्ट राहिलीच ना…आज तुम्ही नाहीत म्हणून मी नक्कीच दु:खी आहे. पण, ज्या दिवसा पासून तुम्ही घरात आहात तेव्हापासून माझ्या जुन्या सोबत्यांचा, किलबिलाट आज मी पुन्हा अनुभवतोय.. त्यांचा सहवास मला जाणवतोय…आणि तो हवाहवासा वाटतोय. त्या पशु-पक्षांनाही  माझ्याशी बोलुद्यात..तुम्ही याला तेव्हा ते पुन्हा दुर जातील…पण तरीही मी  तुमची तेवढ्याच आतुरतेने वाट पाहतोय…कारण तुमच्या शिवाय जगण्याची मलाही सवय नाही, त्यामुळ कोरोनाच हे संकट टाळायला जरा घरातच बसा, आदेशांचं पालन करा…आणि या कोरोनाला परतवून लावल्यावरच माझ्याकडे या….ही कळकळीची विनंती.. तुमचा, सर्वांचा मोती तलाव…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here