जिल्ह्यात ४९२ जण क्वारंटाईन..!

0
1529

सिंधुदुर्गनगरी, दि. २१ : जिल्ह्यात आजमितीस एकूण ४९२ जण क्वारंटाईन असून त्यापैकी ४०० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर ८२ जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. जिल्हा रुग्णालयाने आजपर्यंत पाठवलेल्या १९७ पैकी १६० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. अजून ३७ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशनमध्ये ४८ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी एकूण २६९४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणेमार्फत खालासेमिआचे १० रुग्ण, डायलेसिसचे ३५ रुग्ण आणि केमो थेरपीचा एक रुग्ण यांना सेवा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील निवारा केंद्रांच्या ठिकाणी असलेल्या २२७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ११ मजूर, बेघर व कामगार कॅम्प असून त्याठिकाणी सध्या २२२ जण वास्तव्यास आहेत. त्यांच्या निवासासह जेवण, चहा व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये संचारबंदीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथीलता देण्यात आलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंची व अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू राहणार आहे. तसेच भाजीपाल्याची दुकाने, किराणा मालाची दुकाने सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे असलेल्या कामांना परवानगी दिली आहे. पण, त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. सामाजिक अंतर राखणे, नागरिकांशी कामगारांची थेट संपर्क येणार नाही याची दक्षता घेणे अशा स्वरुपाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करत असल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधितांकडून घेण्यात येत आहे. त्यानंतरच कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्यामध्ये पूल, रस्ते, साकव यासह सरकारी कार्यालये यांच्या कामांचा समावेश आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासही संचारबंदी व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना देऊनच काम सुरू करण्यास परवानगी असणार आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.