शेतकऱ्यांनो, राजकीय भूलथापांना बळी पडू नका.!

0
227

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ : सिंधुदुर्ग जिल्हयात मागील दोन वर्षात काजू बीचा दर प्रती किलो ९० रु. वरुन सुमारे १६० ते १७० रुपयांपर्यंत नेण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतली होती. त्या संबंधीच्या सर्व बैठकांचे आयोजन बाजार समितीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या सभागृहातच अनेकवेळा केले होते. याचा जाणीवपूर्वक विसर बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना पडला आहे, अशी टिका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुकाराम चंद्रकांत साईल यांनी केली आहे. यासंदर्भात ते म्हणतात, काजू बीची आयात मोठ्या प्रमाणात होत असून काजू बी अत्यल्प दरात उपलब्ध होत आहे. सिंधुदुर्गातील स्थानिक काजू बी चवीला उत्कृष्ट असली तरी आयात होणाऱ्या काजू बीच्या तुलनेत महागडी आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील काजू बीला अपेक्षित दर प्रक्रियादारांकडून दिला जात नाही. त्यामुळे सतीश सावंतांनी आपले राजकीय वजन वापरुन आयात होणाऱ्या काज बीवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न करावेत. कोरोनाच्या संकटामुळे बाजारात तयार काजूगर विकला जात नाही. यापुढील किती कालावधीपर्यंत बाजारपेठा सुरळीत होतील हे सांगता येणार नाही. अशा परिस्थीतीत जिल्हयातील काजू प्रक्रियादार पूर्णतः हतबल झाले आहेत. यापूर्वी प्रक्रीया केलेल्या मालाला बाजारपेठ नसल्याने काजूचे दर वाढण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आज जिल्हयात १२० रु. काजूबी खरेदी सुरु असल्याचे सांगणाऱ्यांनी १२० रु. काजूबी खरेदी दराचे ठिकाण सांगावे प्रसंगी जिल्हयाच्या कानाकोपऱ्यातून वाहतूक करुन काजूबी तिथे पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येईल. पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रातील काजू बागायतदार, कारखानदार यांच्या बैठकीत ८० ते ९५ रु. पर्यंतचे काजू बीचे दर तालुकानिहाय घेण्याबाबत निर्णय जाहीर झाला. यामुळेच तर दर वाढीस आळा बसला, तर दुसरीकडे जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे दाखवते, परंतु काजू बी खरेदीसाठी वि. का. संस्थांना मात्र ९ टक्के व्याज दराने कर्ज देण्याची घोषणा करते. विकास संस्थांनी काजू बी १२० रु. प्रती किलो दराने खरेदी करुन त्यासाठी लागणाऱ्या कर्जावर ९ टक्के व्याज भरुन व्यवहार करण्यासाठी किमान १२५ ते १३० रु. प्रती किलोने काजूबी विकास संस्थांकडून कारखानदाराने खरेदी करावी लागेल. ती न झाल्यास वाढणारी घट, वाढणारे व्याज यासह होणाऱ्या नुकसानींमुळे शेतकऱ्यांच्या शेती संस्था नुकसानात जाण्याची भीती आहे. काजू बी दरात दोन वर्षापूर्वी मोठया प्रमाणावर भाववाढ करण्यासाठी जिल्हयातीलच कारखानदारांनी महत्वाचे सहकार्य केले होते. हे ही विसरुन चालणार नाही. कणकवली बाजारपेठेत बाजार समितीच्यावतीने वाढीव दराने खरेदीसाठी प्रक्रियादारांनी काजूबी खरेदी केंद्र सुरु केले होते. त्याचमुळे दरवाढीस संधी मिळाली व शेतकऱ्यांचा फायदा झाला. यामुळे जिल्हयात मागील दोन वर्षात काजू लागवड दुप्पट क्षेत्रात केली गेली. यातच बाजार समितीचे शेतकऱ्यांच्या प्रती असलेले कार्य दिसून येते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्हयातील काजू बी शेतकऱ्याच्या शेतातच पडून आहे. त्यामुळे भविष्यात येणारा पावसाळी व शेतीचा खर्च भागविण्याची चिंता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली. अशा अवस्थेत बाजार समितीने जिल्ह्यातील काजू बी खरेदीदार व्यापाऱ्यांना काजू बी खरेदी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करुन प्रोत्साहित केले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू बीची खरेदी होवून शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी यांच्या मालाला योग्य बाजार पेठ मिळण्यासाठी व संचारबंदीच्या कालावधीत आंबा, काजू मालवाहतूकीचे परवाने मिळणेसाठी पणन मंडळाचे माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय, कृषि विभाग प्रादेशिक वाहन कार्यालय व स्थानिक पोलिस प्रशासक यांचेमार्फत वाहतुक पासाची व्यवस्था बाजार समितीने करुन दिली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने १ कोटी रु. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देवू शकते तर कोरोनाच्या संकटामुळे आलेल्या कठीण प्रसंगाला तोड देण्यासाठी १२० रु. प्रती कीलो काजूबी खरेदी व्हावी, यासाठी जिल्हयातील कारखानदार व्यापारी यांनी बिनव्याजी कर्ज दयावे. जिल्हयातील काजू १२० रु. प्रती दराने खरेदीचे बंधन घालावे अन्यथा शेतकऱ्यांना काजू बी चा दर वाढ होईपर्यंत आवश्यक त्या गरजांसाठी लागणारे पैसे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी वि.का.संस्थांना बिनव्याजी कर्ज दयावे. जेणेकरुन काजू तारणावर वि. का. संस्था शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज त्वरीत देवू शकेल. या गोष्टी जिल्हा बँकेच्या हातात आहेत. काजू बी वाढीव दराने खरेदी व्हावी यासाठी बाजार समिती सातत्याने विविध खरेदीदारांशी संपर्कात आहे. परंतु बाजारपेठांमधील परिस्थितीमुळे यातून योग्य तो मार्ग मिळत नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाने भात खरेदीप्रमाणे हमीभावाने काजू खरेदी करुन प्रक्रिया धारकांना लिलावाने दयावे, अशी मागणीदेखील केली आहे. फक्त दरासंबंधी बोलून फायदा होण्याऐवजी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडून त्वरीत दिलासादायक निर्णय करुन देण्यासाठी सतीश सावंत यांनी आपले राजकीय वजन वापरावे. शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न घेऊन प्रसार माध्यमांच्या माध्यमातुन प्रसिध्दी व राजकिय स्टंटबाजी केली तर खपवून घेतले जाणार नाही. सिधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे प्रतिनीधीत्व करीत असल्याने शेतकऱ्यांचे हीत जपण्याचा नेहमी प्रयत्न करीत असते केवळ प्रसिध्दी न करता शेतकरी , व्यापारी व कारखानदार यांच्या हितासाठी तळमळीने प्रयत्न करीत असते जिल्हयातील शेतकऱ्यांनी कोणाच्याही राजकिय भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन बाजार समितीच्यावतीने समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here