प्रशासनाला केलं जातंय इमोशनल ब्लॅकमेल.!

0
297

ऑन दी स्पॉट : सागर चव्हाण : कोरोनामुक्त असलेला सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये यायला पाहिजे, अशी मागणी जोर धरत असताना आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. त्यामुळे ग्रीन झोनच्या मागणीवर थोडक्यात आता पाणी फिरल्यागत आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेला हा दुसरा रुग्ण आहे. या विषयाच्या खोलात गेलो तर एक बाब प्रकर्षाने समोर येतेय ती म्हणजे हे दोन्ही रुग्ण मुंबईतुन आले होते. म्हणजे थोडक्यात आयात केल्यासारखे. ही वस्तुस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे तर प्रशासन का ठोस भूमिका घेत नाही, हा निश्चित प्रश्न जिल्हावासीयांसमोर उभा राहतोय. त्याच सरळ आणि साधं उत्तर ते म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल ! प्रशासनाला सरळ सरळ इमोशनल ब्लॅकमेल केलंय जातंय. एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याने दिलेली ही धक्कादायक माहिती आहे….त्याच ताज आणि जिवंत उदाहरण द्यायचं असेल तर ते घडलंय सावंतवाडीत. कालचं मुंबईतुन ५ गरोदर महिला सावंतवाडीत आल्या. मुंबईसारख्या रेडझोनमधून आल्या मुळे त्यांना क्वारंटाईन केलं आहे. प्रशासनाने घेतलेली ही एक खबरदारी झाली. मात्र, ‘त्या’ महिला आल्या कश्या ? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. तर निश्चितच त्याला पहिलं कारण म्हणजे ‘त्या’ गरोदर महिलांच्या पाठीशी असलेला राजकीय पदाधिकाऱ्यांचा हात आणि दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल ! त्यामुळे प्रशासनाची कितीही ठोस भूमिका घ्यायची इच्छा असली तरीही घेता येत नाही. जी राज्ये किंवा देश कोरोनामुक्त झाले त्यांनी भावनेला अजिबात महत्व दिले नाही. केरळसारख्या सुशिक्षित राज्यातही नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. म्हणूनच आज जगभरात या नावांची चर्चा आहे. कोरोनाचा बंदोबस्त संपवून घरी जाणारे काही पोलीस अधिकारी काही महिने समोर दिसणाऱ्या आपल्या मुलाला मिठी मारू शकत नव्हते. भावनेपेक्षा कर्तव्याला त्यांनी महत्व दिले. इतके सारे जण अशा परिस्थितीत कोरोनाशी लढत असतानाच आमच्याकडे मात्र इमोशनल ब्लॅकमेल होतंय. हे जर असचं चालू राहील तर मात्र ग्रीनझोन सोडा, ऑरेंज झोनमध्ये असलेला आपला जिल्हा आता रेड झोनमध्ये यायला वेळ लागणार नाही.

_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here