सिंधुदुर्गचा वर्धापनदिन….

0
522

‘अपरान्त’ अर्थात कोकण. पण कोकण हे नाव कसं पडलं, याविषयी इतिहासकारांमध्ये अनेक मत-मतांतरं आढळतात. काही इतिहासकारांच्या मते, दक्षिण कोकण हे आर्याचं मूळ स्थान मानलं जातं. तिथेच राजा भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार व कदंब यांनी आपली राजसत्ता गाजवली. हे कोकणच ह्रदय म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा. १९८१ मध्ये राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून याची निर्मिती केली.
१२१ कि. मी. सागरी व समृद्ध किनारपट्टी, अभिजात निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक गड-किल्ले, शिल्पकलाविष्कारानं नटलेली प्राचीन मंदिर, सागरी जैवविविधता, फळ-बागायतींचं वरदान लाभलेल्या सिंधुदुर्गाला पारंपरिक सण व उत्सवांइतकंच कला, साहित्य व संस्कृतीच्या आविष्कारानंही समृद्ध केलं आहे. त्यामुळेच हा जिल्हा पर्यटकांसाठी आवडता ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. शेजारील गोवा राज्याप्रमाणेच या जिल्ह्यालाही निसर्गाची दैवी देणगी लाभली आहे. इथल्या सांस्कृतिक परंपरेचं गोव्याच्या संस्कृतीशी साधम्र्य आहे, तरीदेखील ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यापेक्षाही इथली संस्कृती व निसर्ग वेगळा आहे.

भागवत धर्माचा पगडा असल्याने इथली माणसं धार्मिक व परंपरावादी असून उत्सवप्रिय आहेत. असे हे सिंधुदुर्गवासी देवधर्म, कुळाचार, धर्माचरण, ग्रामसंस्कार, मौखिक परंपरा, सण व उत्सव, यात्रोत्सव यांचे काटेकोर पालन करतात. ऐक्य व सलोखा यांच्या माध्यमातून त्यांनी सिंधुदुर्गातील धार्मिक, कला, साहित्य व सांस्कृतिक लोकसंस्कृती आजही टिकवलेली आहे. इथल्या अनेक लोककथा व प्रथा या पूर्वापार चालत आलेल्या असून त्यामागे केवळ ग्रामहित व लोककल्याण हाच हेतू आहे. सिंधुदुर्गातील रवळनाथ, माऊली, सातेरी, वेतोबा ही देवस्थानं इतरत्र कोठेच अस्तित्वात नाहीत. प्रत्येक गावात ग्रामदेवता असून वाडीवस्तीवर त्यांची मंदिरं आहेत. कुळाचार व कुळधर्म यांचं पालन करताना तसंच कोणतंही शुभकार्य करताना ग्रामदेवतेचा कौलप्रसाद घेण्याची प्रथा असते. या प्रथा कोकणाबाहेरील लोकांना अंधश्रद्धा वा हास्यास्पद वाटला तरी यांच्या दृष्टीने त्या श्रद्धाच आहेत. अशा काही प्रथांचं पालन करण्यासाठी चाकरमानी (नोकरीपायी बाहेरगावी गेलेली व्यक्ती) जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी गावाकडे परत येतो, ते केवळ मान व श्रद्धेपायी.

ग्रामदेवतांचे जत्रोत्सव, शिमगोत्सव, होलिकोत्सव, गणेशोत्सव व दसरा हे सण मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. अलीकडे पर्यटकांना येथील संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी सिंधु महोत्सव, सागर महोत्सव व क्रीडा महोत्सव यांचं आयोजन करत त्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला जातोय. देवस्थानांतील महत्त्वाचा उत्सव म्हणजे जत्रा. जत्रोत्सवात मंदिर विद्युतरोषणाई करून दीपमाळ दिव्यांनी मंदिर सजवलं जातं. पूजा-अर्चा, नैवेद्य, आरती, भंडारा आदी सोपस्कार झाल्यावर देवाची पालखीतून मिरवणूक, शोभा-यात्रा आदी कार्यक्रम पार पडतात. आजही आंगणेवाडीतील भराडीदेवीची जत्रा, कुणकेश्वर, सोनुर्ली व कर्ली देवीच्या यात्रेला भाविक मोठ्या श्रद्धेने गर्दी करताना दिसतात. कोकणी माणूस मुळातच उत्सवप्रिय असल्याने मोठ्या भक्तिभावाने देवतांच्या या उत्सवांमध्ये सामील होतो. जत्रोत्सवात दशावतारी नाटकं, देवखेळे, नमन, भजन, कीर्तन, प्रवचन, फुगड्या आदी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येते. काही ठिकाणी हरिनाम सप्ताह व दिंडी यांचं आयोजन केलं जातं. नवरात्रात सरस्वतीपूजन करतानाच विजयादशमीला ग्रामदेवतेच्या मंदिरात सोनं लुटण्याचा सामुदायिक कार्यक्रम होतो. यातून सामाजिक ऐक्य व सलोखा राखला जातो.

होळी सण साजरा करण्याची पद्धत गावागणिक वेगवेगळी आहे. पालख्या नाचवणं, ओल्या मातीत लोळण घेऊन माती स्वत:च्या अंगाला फासून घेण्याची कुडाळच्या शिवापूर गावची परंपरा आहे. देवगडच्या खवळे महागणपतीची ३१३ वर्षाची परंपरा आजही तशीच पाळली जाते. वेंगुल्र्यातील तुळसचा जैतीर उत्सव साजरा करताना गावच्या सर्वागीण विकासाचा वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला जातो. मानसीश्वराला आवाजाचा तिटकारा असल्याने तो शांतताप्रिय आहे. तर आरवलीच्या देव वेतोबास मोठी पादत्राणं लागतात. सोनुर्लीची यात्रा लोटांगणासाठी प्रसिद्ध असून शांती आणि अहिंसेचे दैवत असलेला खवणोबा चक्क बुद्धाच्या रूपात आढळतो.
अनेक वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या सिंधुदुर्गात आजही प्रथांची जपणूक करतानाच संपूर्ण गावाचं सुख व स्वास्थ्य राखण्याच्या कामी कोणतीच तडजोड केली जात नाही. आठ तालुक्यांतील ७३७ गावांमधून मालवणी व कुडाळी बोलीभाषा बोलल्या जातात त्या याच संस्कृतीच्या अंगीकारामुळे, त्याच्या प्रभावामुळे!

अध्यात्माच्या दृष्टीने येथे वारकरी, दत्तात्रय व रामदासी संप्रदाय आढळतात. जशी हिंदूंची मंदिरं आहेत तसंच चर्च, मशिदी व बुद्धविहारही आहेत. तमाशा, दशावतार, चित्रकथी, कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, पांगुळाचा खेळ, गोंधळ व वासुदेव आदी प्राचीन परंपरांचा मोठा ठेवा या जिल्ह्यात जपण्याचा प्रयत्न कोकणवासीय आजही करत आहेत. अनेक संत, महंत या मातीत लोकप्रबोधनाचं कार्य करून गेले. त्यामध्ये टेंबे स्वामी, भालचंद्र महाराज यांचं कार्य मोलाचं आहे.
सिंधुदुर्गात प्राचीन शिल्पकलेच्या नमुन्यामध्ये कुणकेश्वर, विमलेश्वर व रामेश्वर आदी मंदिरं, सावंतवाडीतील चित्तारआळी येथील लाकडी खेळणी, लाखकाम, वाडे येथील अडकित्ते अशा अनेक कला, लोककला, संगीत, चित्रं, शिल्पकला पाहायला मिळतात. तसंच साहित्य, संस्कृती-परंपरा यात आपलं योगदान देत संपूर्ण जिल्ह्याची सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचे महान कार्य इथल्या लोकांनी केलं आहे. म्हणूनच आज हा जिल्हा जगाच्या नकाशावर पोहोचला आहे. इथल्या संस्कृती-परंपरांची महती, लोकप्रियता आता अटकेपार पोहोचली आहे. उत्तम पर्यटनाचा अनुभव प्रवासी पर्यटकांना मिळत असल्यामुळे या जिल्ह्याची ख्याती सर्वदूर पसरत आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here