कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील ६ जणांना गावाबाहेर, सुरक्षित करावे क्वारंटाईन ; सरपंच सुमन कामत यांची मागणी

0
509

वेंगुर्ला, दि. ०६ : वायंगणी गावामधील आंबा वाहतूक करणारा चालक हा कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाने, आरोग्य विभागाने तातडीने याबाबत ठोस पावले उचलून त्या व्यक्तीच्या कुटुंबातील ६ व्यक्तींना गावाच्या दूर व सुरक्षित ठिकाणी क्वारंटाईन करावे व त्यांच्या योग्य त्या वैद्यकीय तपासण्या कराव्यात, अशी मागणी वायंगणी सरपंच सुमन कामत यांनी केली आहे. आपला कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यास सरपंच म्हणून माझा विरोध नाही. मात्र अशा प्रकारे रेड झोनमध्ये जाऊन जे वाहन चालक येत आहेत त्यांची योग्य ती काळजी हे ट्रान्सपोर्ट मालक घेत नसल्याने अशी परिस्थिती उद्भवत आहे. हे वेळोवेळी आम्ही पत्राद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले असल्याचेही सरपंच कामत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३ वर पोचली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावातील आंबा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चालक असलेल्या व्यक्तीचे रिपोर्ट काल कोरोना पोझीटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबात एकूण ६ व्यक्ती असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी वेंगुर्ला तहसील कार्यालयात भेट देऊन तहसीलदार प्रविण लोकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे व प्रशासकीय इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच वायंगणी गावात जाऊन पाहणी केली. याबाबत बोलताना सरपंच कामत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनामार्फत देण्यात आलेल्या सूचनांचे पालन व याबाबत उपाययोजना वेळोवेळी ग्रामपंचायतकडून राबवण्यात येत आहेत. जो गावातील कोरोनाबाधित रुग्ण तो एका आंबा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमार्फत मुंबईत आंबे देऊन आल्याचे आम्हाला समजताच तो ज्यादिवशी गावात आला, त्यादिवशी त्याच्याशी संपर्क साधून त्याचा जबाब घेतला व त्यांना होम क्वारंटाईन केले होते. तसेच या व्यक्तीला गावच्या बाहेर क्वारंटाईन करण्यासंदर्भात ग्राम कृती समिती तसेच सर्व ग्रा. प. सदस्य, आरोग्य विभाग यांच्यामार्फत प्रयत्न करण्यात आले होते, असे सरपंच कामत म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.