सोशल डीस्टन्सिंगसाठी नगरपंचायतीने अधिक व्हावे कठोर..!

0
373

दोडामार्ग, दि. १० : रविवारी दोडामार्ग शहराचा आठवडा बाजार असल्याने हा आठवडा बाजार भरला नसला तरी नागरिक गर्दी करायची तशीच करत आहेत. या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलीस प्रशासनाला मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोडामार्ग भाजी मार्केटला झालेली तोबा गर्दी आवरण्यासाठी अखेर दोडामार्गचे पोलीस निरीक्षक यांनाच फौजफाट्यासह रस्त्यावर उभे राहावे लागले, तेव्हा कुठे बेशिस्त गर्दीला लगाम बसला. बाजारपेठ सुरू केली तरी गर्दी आणि सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळण्यात नागरिकांना शिस्त आणण्यात नगरपंचायत सपशेल अपयशी ठरत आहे. कर्मचारी नियुक्त केले तरी गर्दी आणि सोशल डीस्टन्सिंग राखण्यात नगरपंचायत प्रशासन तोकडे पडत असल्याचे चित्र आहे. उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण थेट बाजारपेठ परिसरात स्वतः ठाण मांडून नजर ठेवून असले तरी त्यांचे शर्थीचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. मात्र आज नेहमीप्रमाणे ते नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या सोबत मैदानात उतरल्याने दोडामार्ग बस स्टँडवर भाजी मार्केटमध्ये तेवढे सोशल डीस्टन्सिंगचे नियम राखू शकले. त्यात १० च्या सुमारास पोलीस निरीक्षक यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा करून तेथील चित्र बघून जातिनिशी लक्ष घातल्याने या गर्दीला थोडासा आवर घालता आला. लागूनच भाजी व मच्छी मार्केट असल्याने ही गर्दी उसळत असली तरी स्वतःहून नागरिक सोशल डीस्टन्सिंगचा नियम सपशेल मोडत आहेत. मात्र लॉकडॉऊन शिथिलता व बाजारपेठ खुली केल्याने गेले अनेक दिवस बाजारपेठमध्ये तैनात पोलीस फाटा बंद झाल्याने नागरिक अत्यंत बेशिस्तपणे वावरत आहेत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने होणाऱ्या बेशिस्त गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.