वादळी वाऱ्यात महावितरणचे २० लाखाचे नुकसान

0
566
कणकवली : १७ मे रोजी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे महावितरणला मोठा फटका बसला असून वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात मिळून सुमारे २० लाखांचे नुकसान झाले आहे. खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर महावितरणचे कर्मचारी आणि खाजगी एजन्सी काम करत असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल असे महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितले. १७ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात थैमान घातले होते. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेल्या सोसाट्याचा वारा आणि दमदार पावसाने दोन्ही तालुक्यांत महावितरणचे तब्बल २० लाखाचे नुकसान केले. पावसाळी हंगामात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे शीघ्रगतीने पूर्ण करणार असून जनतेला दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा अधीक्षक अभियंता पाटील यांनी केला. यावेळी कार्यकारी अभियंता संजय गवळी उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.