तपासणी नाक्यावर आता होणार आधारकार्डचीही तपासणी : जिल्हाधिकारी

0
480

सिंधुदुर्गनगरी, दि. २० : जिल्ह्यात सध्या राज्यातील विविध भागातून नागरिक पास घेऊन येत आहेत. पास घेताना एखादी कंटेन्मेंट झोन मधील व्यक्ती कोविड – १९ या पोर्टलवर नोंदणी करताना आपला चुकीचा पत्ता टाकून नोंदणी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे आधारकार्ड व त्यावरील पत्ता तपासणे बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारे कोणीही व्यक्ती जिल्ह्यात प्रवेश करू शकणार नाही. याविषयी तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी तपासणी नाक्यावरील अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत कडक सुचना देण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तपासणी नाक्यावरील कामात हलगर्जीपणा केल्यास नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र कोविड १९ आदेश, सुचना तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ) १८६० च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.