वैभववाडीत भाजपाचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’..!

0
242

वैभववाडी, दि. २२ : राज्यात आज भाजपाने पुकारलेले ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ वैभववाडी तालुक्यातही करण्यात आले. वैभववाडी भाजपाच्यावतीने आज सकाळी पक्ष कार्यालयासमोर हे आंदोलन छेडले. काळे झेंडे फडकवून भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, पं.स. सदस्य अरविंद रावराणे, नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक संतोष माईणकर, महेश गोखले, प्रदीप नारकर, संदीप नारकर आदी उपस्थित होते. यावेळी नासीर काझी म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करण्यात राज्य शासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. विलगीकरणात तालुक्यात हजारो चाकरमानी दाखल झाले आहेत. मात्र केवळ दररोज सात जणांच्या टेस्ट केल्या जात आहेत. कोकणच्या जीवावर सत्ता भोगणार्‍या सेनेने या आपत्तीत कोकणवासीयांना पोरके केले आहे. या शासनाचा निषेध करावा तितका थोडाच आहे. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यात कोणतेही नियोजन, यंत्रणा उभी करण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांत नाही. मात्र चाकरमान्यांना गावी जा असे सत्ताधारी सांगत आहेत. गावी येणाऱ्या चाकरमान्यांना चेक नाक्यावर पोलिसांचा मार खावा लागत आहे. नियोजनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे असा आरोप त्यांनी केला. लॉकडाऊन काळात भाजपच्यावतीने तालुक्यात गरीब, गरजू व्यक्ती व भुकेलेल्यांना कमळथाळी उपक्रम सुरू करण्यात आला. मजूर व परप्रांतीयांना धान्य व भाजीपाला पुरविण्यात आला. आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील सर्व डॉक्टर व सरपंच यांना पीपीई कीट दिले आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांच्या अडचणी वाढत आहे, अशी टीका श्री. काझी यांनी केली.
.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.