सुशांतनं घेतली होती चंद्रावर जमीन..!

0
11688

हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील उदयोन्मुख अभिनेता सुशांतसिंग राजपुतच्या धक्कादायक आत्महत्येनंतर त्याच्या छोट्याशा पण अद्भूत जीवनाविषयी अनेक प्रकारची नाविण्यपूर्ण माहिती पुढे येत आहे. आपल्या करियरमध्ये सुशांतने नाव, प्रसिध्दीसह भरपूर पैसाही कमावला होता. त्या पैशांचा उपयोग त्याने आपली अनोखी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केला.
सुशांतची स्वप्नेही अगदी असामान्य स्वरुपाची होती. आपले असेच एक स्वप्न त्याने पूर्ण केले जे आपल्यासाठी टिंगलीचेच विषय ठरणारे आहे. सुरुवातीपासून अ‍ॅस्ट्रोनॉट बनण्याचे स्वप्न उरी बाळगलेल्या सुशांतने चक्क चंद्रावर जमीन खरेदी करुन आपली ही हौसही भागवली. त्याने चंद्रावरील मेर मस्कोव्हीन्स नावाच्या विभागात हा भूभाग खरेदी केला आहे. त्याआधी कोणी तरी शाहरुख खानलाही चंद्रावरील मोठा भुखंड भेट म्हणून दिल्याची बातमी आली होती. सुशांतची ही खरेदी अनेकजणांच्या टिंगलीचा विषय बनली होती. कारण एकतर चंद्राच्या भुभागावर कोणत्याही देशाची किंवा कंपनीची मालकी नसते. त्यामुळे तिथे कोणी जमीन खरेदी करण्याचा किंवा विक्री करण्याचा व्यवहार करणे म्हणजे निव्वळ स्वप्नरंजनच. परंतु सुशांत राजपूतसारखे काही तरी फँटसी कल्पनार्‍या लोकांना इतरजण काय म्हणतील याची पर्वाच कुठे असते? त्याने आपल्याला त्या काल्पनिक जमिनीवर कधीही पोहचता येणार नाही, हे माहित असूनही त्यासाठी पैसे खर्च केले. विशेष म्हणजे सुशांत घरी असताना आपल्याकडील अत्याधुनीक अशा मेड १४ एलएक्स ६०० दुर्बिणीतून चंद्रावरील आपल्या भुभागाचे नेहमी निरीक्षण करीत असल्याचेही त्याने सांगितले होते. चंद्रावर जमीन खरेदी करणे म्हणजे पैसे वाया घालवणे आहे. हे माहित असूनही सुशांतसारखे जगातील अनेक स्वप्नवेडे लोक तिथे ही रियल इस्टेट खरेदी करीत असतात. अर्थात यासाठी जास्त पैसेही मोजावे लागत नसल्यामुळे लोक शेकडो एकर जमीनही खरेदी करुन त्यावर आपली काल्पनिक मालकी प्रस्थापीत करतात. lunarregistry.com, www.lunarland.com या दोन प्रमुख वेबसाईट्सवर चंद्राच्या भुभागांची खरेदी-विक्री केली जाते. फक्त २० डॉलर्स म्हणजेच सुमारे दीड हजार रुपयांत चंद्रावरील एक एकर जमिनीची खरेदी करता येते. फक्त तिची अधिकारीक कागदपत्रे मागू नयेत किंवा भविष्यात तिची विक्री करुन मोठा फायदा मिळवण्याची स्वप्ने पाहू नयेत.