खतांचा पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन : मनीष दळवी

0
155

वेंगुर्ला : दि. १७ : वेंगुर्ला तालुक्यात खरीप हंगामात लागणारा रासायनिक खतांचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात झाला असून तात्काळ खत उपलब्ध करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन मनीष दळवी यांनी दिला आहे. तालुक्यात भात शेतीसाठी लागणारे खत शेतकऱ्यांना गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडे उपलब्ध नसल्याने शेतकरी हावलदित झाले आहेत. तालुक्यासाठी विविध खत कंपन्यांकडून सुमारे २००० टणापर्यंत सहकारी संस्थांकडे खतांची आवश्यकता असताना आज रोजिपर्यंत तालुक्यात फक्त ४११ टन खताचा पुरवठा झाला असून त्यापैकी १०४ टन सहकारी संस्थांना आणि ३०७ टन खाजगी व्यापाऱ्यांना पुरवठा झाल्याचं दिसून येत आहे ही गोष्ट अत्यंत गंभीर असून यामुळे सामान्य शेतकरी आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत यासाठी कृषि विभागाचे अयोग्य नियोजन कारणीभूत आहे. काही खाजगी व्यापार्यांकडे शेतकऱ्यांना खतांची जास्त किंमत देवून खत खरेदी करावी लागत आहे. खाजगी व्यापाऱ्यांना झालेला पुरवठा पाहता खत कंपन्याचे प्रतिनिधी आणि कृषि अधीक्षक व कृषि विभाग यांचे जाणीवपूर्वक कारस्थान आहे. सहकारी संस्थाकडे खतांची उपलब्धता नसल्याने शेतकरी शेती कर्ज परतफेड न करता त्याच्याकडे असलेल्या पैशात गरज म्हणून जादा दरात खतांची खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती कर्ज थकीत होणार असून शेतकरी पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. यासाठी कृषि विभागाने त्वरित उपाययोजना करून आवश्यक सर्व प्रकारचे खतांची उपलब्धता आठवडाभरात खत कंपन्याकडून संस्थांना न झाल्यास सर्व संस्थांचे प्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यासह तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन मनिष दळवी यांनी दिला आहे.