पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा सन्मान कार्यक्रमाचा निषेध म्हणजे पोटशुळ; नगरसेविका सुमन निकम यांना नगरसेवक प्रशांत आपटे यांचे प्रत्युत्तर

0
258

वेंगुर्ला : दि. १८ : वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. त्यावर शिवसेना नगरसेविका सुमन निकम यांनी निषेध व्यक्त केला. या प्रकाराला पोटसुळ उठणे असे म्हणतात असा टोला लगावत पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नांशी कुठलीही अढी मनात न ठेवता एकत्रित काम केल्यास नगरपरिषदेचे पर्यायाने शहर विकासाच्या दृष्टीने त्याचा हातभार लागेल असा सल्ला भाजपचे नगरसेवक प्रशांत आपटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला. कोणत्‍याही चांगल्‍या कामाला प्रोत्‍साहन दिले की काम करणा-या व्‍यक्‍तींचा हुरुप वाढतो व काम करताना ऊर्जा प्राप्‍त होते. पाणी टंचाईबाबतचा पूर्व इतिहास पहाता यावर्षी वेंगुर्ला शहरात पाणी टॅंकर फिरवावा लागला नाही ही वस्‍तुस्थिती आहे आणि ती कोणीही नाकारु शकत नाही. यासाठी मागील तीन वर्षात शहरातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्‍याचा प्रयत्न केलेला आहे. हे केवळ प्रसिद्धीसाठी नाही तर प्रत्‍यक्ष कामे नियोजित करुन ती पूर्णत्‍वाच्‍या दिशेने चाललेली वाटचाल आणि त्‍यातून भविष्‍यात पाणीटंचाई होऊ न देणे हे उद्दिष्‍ट डोळयासमोर ठेवून नगरपरिषद काम करित आहे.
कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर चाकरमान्‍यांच्‍या सोईसाठी तसेच स्वच्छतेच्या दृष्‍टीने पाणी वापर मोठया प्रमाणावर होत असल्‍याने पाणीपुरवठा कर्मचा-यांवर प्रत्‍यक्ष ताण येत होता असे असूनही पाणीपुरवठा कर्मचा-यांनी नगराध्‍यक्ष, मुख्‍याधिकारी, उपनगराध्‍यक्षा व सर्व नगरसेवक यांच्‍या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध काम केलेले आहे. आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून काम करित असलो तरी प्रत्यक्ष काम करणा-या व राबणा-या सर्व हातांचे कौतुक हे करणे क्रमप्राप्‍त होते. ती ही माणसे आहेत. माणुसकीच्‍या नात्‍याने विचार केल्‍यास प्रशासकीय कामात येणारे सर्व अडथळे नगरसेवक म्हणून ज्ञात असावेत. वेंगुर्ला नगरपरिषद लोकाभिमुख कामे करत आहे व भविष्‍यात तशीच कामे करत राहील. केलेल्या कामाचा मोठेपणा म्हणून नगराध्यक्ष कधीच गवगवा करीत नाही उलट केलेल्या कामाचे श्रेय कायम नगराध्यक्ष यांनी आपल्या कर्मचा-यांना आणि सहका-यांना दिलेले आहे. चुका या माणसाकडूनच होतात याची जाणीव असल्याने नगराध्यक्ष यांनी दर वेळेस प्रत्येक मिटिंगच्या वेळी कुणाच्या समस्या, त्रुटी असल्यास सांगाव्यात आणि अशा प्रश्नांसंदर्भात थेट भेटावे असे नागरिकांनाही आवाहन केले आहे. आपण तर नगरसेवक आहात. नगरपरिषद क्षेत्रातील एक घटक म्हणून वावरत आहात त्यामुळे विरोध करायचा म्हणून न करता चांगल्याला चांगलं म्हणायचा मोठेपणा ठेवलात तर आपण नगरसेविका आहात हे ओरडून सांगायची वेळ येणार नाही. वेंगुर्ला नगरपरिषद पाणीपुरवठा कर्मचा-यांचा सत्काराचा आपण निषेध व्यक्‍त करुन आपण आपल्‍या बुद्धीची उंची दाखवून दाखवून दिलेली आहे अशी संकुचित वृत्ती सोडून मोठया मनाने डोळे उघडे ठेवून आपल्‍या आजूबाजूला बघा चांगल्या कामाचे कौतुक करण्याचा मोठेपणा दाखवा. आपण सर्वांपासून वेगळे का पडले आहोत त्‍याचा आंतरमनात डोकावून विचार करावा, विरोधाला विरेाध करुन जनतेचे प्रेम मिळत नाही. खोटेपणा जास्‍त दिवस चालत नाही. पक्षातील आपले स्‍थान टिकविण्‍यासाठी मा. आमदार, मा. खासदार तसेच मा. पालकमंत्री साहेबांचा नावाचा वापर करुन पेपरबाजी करुन त्‍यांचेसमोर आपली प्रतिमा उजळून निघेल असे वाटत असले तरी आपली पक्षातील किंमत किती हे अगोदर जाणून घ्‍या. शिवसेना पक्षाद्वारे अधिकृतरित्या निवडून आलेल्‍या उपनगराध्‍यक्षांनी सदरच्‍या कार्यक्रमाला उपस्थित राहून कर्मचा-यांप्रती असलेली आपली भावना दाखवून दिलेली आहे. उगाच या गोष्‍टीला पक्षाचे लेबल लावून आणि त्‍याचे नाव घेवून आपल्‍या बरोबरच पक्षाला बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न करु नका.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.