महाराष्ट्रातील संपन्नतेचे सर्व श्रेय कृषिक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांना : एम. के. गावडे

0
517

वेंगुर्ले, दि. ०२ : महाराष्ट्रातील संपन्नतेचे सर्व श्रेय कृषिक्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांना जाते. कृषीदिनी महाराष्ट्रातील जनता त्यांच्या कार्याबद्दल अत्यंत ऋणी आहे, असे प्रतिपादन कृषिभूषण एम. के. गावडे यांनी केले. स्वातंत्र्यानंतर देशात अन्नधान्याचा भयंकर तुटवडा होता. त्यावेळी १९५० मध्ये २८ कोटी जनतेला एकवेळ पुरेसे अन्नधान्य नव्हते. देशाचे तत्कालीन पंतप्रधान कै. लालबहाद्दूर शास्त्री होते. त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ हे धोरण राबविले, ही हरितक्रांती होती. त्यावेळी कै. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण केला. त्यावेळी केंद्रशासन व राज्यशासन यांनी सुधारित बियाणे, सबसिडीवर रासायनिक खतांचा पुरवठा केला आणि त्याचा परिणाम भारत गेल्या ६० वर्षात अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला.त्यामुळे आघाडीचे मनमोहन सिंग यांचे सरकार अन्नसुरक्षा कायदा आणू शकले. महाराष्ट्रामध्ये आज जी संपन्नता आहे,त्याचे सर्व श्रेय कै. वसंतराव नाईक यांनाच द्यावे लागेल. म्हणून त्यांचा १ जुलै हा जन्मदिवस कृषीदिन म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे राज्याचे कृषीमंत्री झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत असताना फक्त भातशेती करून शेतकरी सुखी होऊ शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन शरद पवार यांनी १०० टक्के अनुदानावर फळझाड लागवड ही योजना सुरू केली व कोकणची मनिऑर्डर संस्कृती बंद केली. शरद पवार देशामध्ये कृषीमंत्री असताना राष्ट्रीय फलोद्यान योजना सुरू केली आणि महाराष्ट्रामध्ये उत्पादित फळावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग सुरू झाले. त्यामध्ये कोकणचा आंबा असेल,नागपूरची संत्री, तसेच नाशिकची द्राक्षे. शेतकऱ्यांच्या या फळपिकाना भाव मिळवून देण्यासाठी ही फलोद्यान योजना कामी आली. महाराष्ट्र शासनाने कै. वसंतराव नाईक यांच्या नावाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०१२ या वर्षी देऊन माझा गौरव केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे यावेळी कृषिभूषण एम. के. गावडे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.