कोरोनामुळे घरपट्टी, पाणी पट्टी माफ करावी : राजन दाभोलकर

0
247

कणकवली, दि. ०७ : कोरोनाच्या संकटामुळे कणकवली शहरात सर्व व्यापारी, छोटेमोठे व्यावसायिक आणि सरकारी नोकरांपासून सर्वांच्या आर्थिक व्यवसायावर प्रचंड ताण पडलेला आहे. शिवाय अनेक लोक सध्या घराघरातील आजारपणे, बेरोजगारी वगैरेमुळे आर्थिक ताणाताणीचे जीवन जगत आहेत. त्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीने सर्व नागरिकांची चालू वर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी मनेसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी केली आहे. गेली काही वर्षे कणकवली शहर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शहरामध्ये विकासकामेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. विविध निवासी इमारती, व्यापारी, कॉम्प्लेक्स यांचीही भर पडत आहे. त्यातून नगरपंचायतीला घरपट्टी आणि पाणीपट्टी यांच्या माध्यमातून कर रुपाने जादा उत्पन्नही मिळत आहे. त्याचबरोबर शहरातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाणी पुरवठा, विद्युत व्यवस्था वगैरेचा अतिरिक्त भार पडत आहे. याची नागरिकांनाही जाणीव आहे. त्यामुळे आतापर्यंत नागरिकांनी वाढीव घरपट्टी अथवा पाणीपट्टी भरण्याबाबत कधीही विरोध केलेला नाही. आता यावर्षी पाणीपट्टी मीटरप्रमाणे घेण्याचे नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठरविण्यांत आले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाणीपट्टीचा बोजा नागरिकांवर पडणार आहे. परंतु कोरोनाच्या महासंकटामध्ये नागरिक आर्थिकदृष्टया होरपळून निघत असताना त्यांना दिलासा देण्यासाठी नगरपंचायतीने यावर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ केल्यास कणकवलीतील नागरिक प्रशासनाचे आणि नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे निश्चितपणे ऋणी होतील यात शंका नाही, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी केली आहे.