बंधारा फुटून खारे पाणी घुसलं शेतात ; शेतकरी आक्रमक

0
200

सावंतवाडी, दि. ०७ : आरोंंदा शिपेतूवाडी येथे खार बंधारा फुटल्याने खारेपाणी शेत जमिनीत घुसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण जातंय. त्यामुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. शिपेतुवाडी येथे गेल्यावर्षी पण शेतीत खारे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या बंधाऱ्याचे बांधकाम दोन वर्षपूर्वी मंजूर असूनही अद्याप पूर्ण न केल्याने त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे नुकसानीची आपण प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केल्यानंतर खार बंधारे अधिकारी पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. खार बंधाऱ्याला असलेली झडपे तुटल्याने खारे पाणी शेत जमिनीत घुसल्याचे निदर्शनास आले. या झडपांचे काम काही महिन्यांंपूर्वीच करण्यात आले असताना हे झडप कसे फुटले ? याचा अर्थ केलेले काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोपही उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी केला. यावेळी उपस्थित सरपंच उमा बुडे यांनी कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे खारे पाणी शेतीत घुसून शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पाटील यांना विचारत जाब विचारला. यावेळी फुटलेले झडप बसविण्यासाठी आपण येत्या दोन दिवसात उपाययोजना करतो असे आश्वासन पाटील यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी पोलीस पाटील जितेंद्र जाधव, तलाठी सोळंखी व ग्रामस्थ उपस्थित होते.