परभणीतून मालवणात आलेले अधिकारी थेट कार्यालयात हजर

0
573

मालवण, दि. ०९ : अन्य जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीला क्वारंटाईन होणे बंधनकारक असताना परभणी येथून मालवण वीज वितरण कार्यालयात आलेले अधिकारी क्वारंटाईन न होता थेट कार्यालयात हजार झाले. दरम्यान, पोलीस पाटील वासुदेव गावकर यांच्या कर्तव्यदक्षतेनंतर अखेर पालिका प्रशासनाच्या आदेशाने वीज अधिकारी क्वारंटाईन झाले. पाच दिवसांच्या सुट्टीवर गावी परभणी येथे गेलेले वीज अधिकारी सुट्टी कालावधी संपल्यानंतर बुधवारी रात्री मालवण येथे आले. मालवण ग्रामीण रुग्णालयात त्यांनी तपासणी व नोंद केली. गुरुवारी सकाळी हे अधिकारी वीज कार्यालयात आपल्या सेवेत हजर झाले. याबाबतची माहिती पोलीस पाटील वासुदेव गावकर यांना मिळताच त्यांनी अधिक चौकशी केली. तसेच त्या अधिकाऱ्यांना फोन केला असता अत्यावश्यक सेवेत आम्ही येत असल्याने क्वारंटाईन आवश्यक नसल्याचे सांगितले. पोलीस पाटील गावकर यांनी याबाबत शहर कोविड नियंत्रण समिती सदस्य अमित खोत व उमेश मांजरेकर यांना माहिती दिली. तहसीलदार अजय पाटणे व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनाही माहिती देण्यात आली. याबाबत प्रशासन स्तरावर तात्काळ दखल घेत त्या अधिकाऱ्यांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या. खबरदारी म्हणून क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. नियम सर्वांना सारखेच. मालवण शहरवासीयांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वात महत्वाची असल्याचे नगराध्यक्ष तथा शहर कोविड नियंत्रण समिती अध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रशासनाने सर्व माहिती घेतल्यानंतर मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी त्या वीज अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनेनुसार ते तात्काळ क्वारंटाईन झाले. यापूर्वी प्राप्त एका आदेशात अत्यावश्यक सेवेतील शासकीय अधिकारी, कर्मचारी ‘ऑन ड्युटी’ सेवा बजावून आले असतील तर क्वारंटाईन कालावधीत शिथिलता होती. अशी माहिती तहसीलदार यांनी दिली. त्यामुळे त्या आदेशावर अधिकारी थेट सेवेत हजर झाल्याने गोंधळ उडाला अशी शक्यता आहे. मात्र या साऱ्या प्रकारात प्रशासनाची धावपळ झाली. कोरोना काळात डॉक्टर, पोलीस यासह पोलीस पाटीलही दिवसरात्र सेवा बजावत आहेत. मालवण शहरात सेवा बजवणाऱ्या पोलीस पाटील वासुदेव गावकर यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेने शहर कोविड नियंत्रण समितीकडून कौतुक करण्यात आले. त्या बरोबर क्वारंटाईन नियमांचे सर्वांनी पालन करावे. अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल असेही समितीकडून स्पष्ट करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.