सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्यावतीने आयोजित २१ वा कबड्डी दिन उत्साहात

0
251

सिंधुदुर्ग, दि. १६ : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्यावतीने कुडाळ येथे २१ वा कबड्डी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन कार्यवाह दिनेश चव्हाण, कबड्डी आश्रयदाते मसगे, राज्य पंच व कार्यक्रम आयोजन प्रमुख राजेश सिंगनाथ राज्य पंच व सूत्रसंचालक सागर पांगुळ, राष्ट्रीय पंच प्रीतम वालावलकर, राज्यस्तरीय खेळाडू आनंद ठाकूर आदी मान्यवर व खेळाडू उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या प्रतिमेस वंदन करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राज्य पंच राजेश सिंगनाथ सर यांनी कबड्डी दिनाचे महत्त्व ,कबड्डी महर्षी बुवा साळवी यांचे कबड्डी मधील योगदान यावर आपले विचार मांडले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय किरण बोरवडेकर यांनी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनची यशस्वी वाटचाल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंसाठी शासकीय नोकरीमध्ये मिळणाऱ्या थेट नियुक्त्या व शासन स्तरावरील भरती प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय पंच प्रीतम वालावलकर यांनी कबड्डी महर्षी बुवा साळवी तसेच कबड्डी तपस्वी रमेश देवाडीकर यांच्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वाटचालीतील योगदानाबद्दल आपले विचार मांडले तर राज्यस्तरीय खेळाडू आनंद ठाकूर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या समर्पित त्यागामुळे कबड्डी खेळाला व आमच्यासारख्या ग्रामीण खेळाडूना प्रतिष्ठा मिळत आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात आपले विचार मांडताना कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी कबड्डी महर्षी बुवा साळवी यांचे सिंधुदुर्गातील योगदान , सिंधुदुर्गावर असलेले त्यांचे विशेष प्रेम, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे संस्थापक कै. विलास रांगणेकर व बुवा साळवी यामधील मैत्रीपूर्ण नाते , बुवा साळवी यांच्यासोबत आपल्याला काम करायची मिळालेली संधी, त्यांच्या सानिध्यात मिळालेले मौलिक मार्गदर्शन ,त्यांचा सहवास आदी बाबींवर आपले अनुभव व्यक्त केले. त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डीला राज्यस्तरावर मानाचे स्थान मिळण्यासाठी जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंनी सातत्यपूर्ण परिश्रम घ्यावेत ,तालुका पदाधिकारी पंच कार्यकर्ते व खेळाडूंनी आपापल्या भूमिका उत्तम रित्या पार पाडाव्यात असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले.