राफेलचा आज हवाई दलात समावेश

0
318

अंबाला, दि. १० : भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानांचा आज अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. एका सोहळ्यात राफेल विमानांचा अंबाला एअर बेसमध्ये समावेश होईल. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. ही विमानं हवाई दलाच्या सतराव्या स्क्वॉड्रन, ‘गोल्डन एअरो’चा भाग असतील. पाच राफेल विमानांची पहिली खेप २७ जुलै रोजी फ्रान्सहून अंबाला इथल्या हवाई दलाच्या एअर बेसवर पोहोचली होती. सीडीएस जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख आर के एस भदौरिया, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, संरक्षण विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांच्यासह संरक्षण मंत्रालय आणइ सशस्त्र दलाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या सोहळ्याला उपस्थित असतील. भारतीय हवाई दलाच्या इतिहासात नोंद होणाऱ्या या मोठ्या घटनेचे ते साक्षीदार असतील. या निमित्ताने भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनिन, हवाई दल प्रमुख एरिक ऑटेलेट, फ्रान्सच्या हवाई दलाचे उपप्रमुख आणि अन्य अधिकारी फ्रान्सच्या शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व करतील.