बाबुराव धुरी यांच्या मध्यस्थीने हेवाळेचे उपोषण मागे

0
251

दोडामार्ग : दि. १६ : नवीन हेवाळे पुलासाठी निधी उपलब्ध व्हावा व वाहून गेलेल्या कॉजवे पुलाच्या ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर बांधावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो हेवाळे ग्रामस्थांनी आजपासून सुरू केलेले आमरण उपोषण शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी यांच्या यशस्वी शिष्टाईने अवघ्या चार तासात मागे घेण्यात आले. पाटबंधारे खात्याने वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती व संरक्षक भिंत बांधण्याचे लेखी आश्वासन उपोषण कर्त्यांना दिले आहे.
नाबार्ड मधून प्रस्तावित असलेल्या मूळस हेवाळे पुलासाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर व्हावा व पाटबंधारे खात्याने बांधलेला यावर्षी वाहून गेलेल्या कॉजवे पुलाची दुरुस्ती न करता त्या ठिकाणी नव्याने पूल बांधावा या मागणीसाठी मायकल लोबो व ग्रामस्थांनी आज पासून आमरण उपोषण सुरू केले होते. काल शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली होती. पालकमंत्री यांचे पत्रही दिले होते. मात्र मार्ग निघाला नव्हता वाहून गेलेल्या पुलाच्या जागी बॉक्स स्ट्रक्चर दुरुस्ती व्हावी अशी मागणी करत आज उपोषण झाले. अखेर पुन्हा आजही बाबुराव धुरी यांनीच पुढाकार घेत तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व तिलारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना हेवाळे येथे नेत उपोषणकर्त्यांशी चर्चा घडवून आणली. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती आंदोलकांच्या मागणीनुसार वाहून गेलेल्या कॉजवे पुलाच्या ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर बांधकाम व पुलाच्या बाजूनं संरक्षक भिंत बांधून देण्याचे लेखी आश्वासन पाटबंधारे विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता बाळासाहेब आजगेकर यांनी दिले. डिसेंबर २० पर्यंत हे दुरुस्ती काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आपण उपोषण मागे घेतल्याचे मायकल लोबो यांनी स्पष्ठ केले आहे. यावेळी बाबुराव धुरी यांच्या समवेत सभापती सौ. संजना कोरगावकर, तहसीलदार कर्पे, बांधकामचे अधिकारी विजय चव्हाण, संदीप कोरगावकर उपस्थित होते. आंदोलनात लोबो यांच्यासमवेत जयवंत देसाई, लक्ष्मण गवस, दत्ताराम देसाई, तातोबा देसाई, संदेश राणे, राजाराम देसाई यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.