कबड्डीच्या पंढरीचा वारकरी पुन्हा होणे नाही

0
391

काल रात्री कबड्डीतील माझ्या सहकाऱ्यांचे एका मागोमाग एक मला फोन येऊ लागले. त्या सर्व जणांच्या कापरत्या स्वरातून, आपल्या हक्काचा माणूस, आपल्या परिवारातील सदस्य सुदनजी बांदिवडेकर सोडून गेल्याची हळहळ व्यक्त होत होती. मी पूर्णतः निशब्द होतो. काहीही सुचत नव्हते. माझ्या डोळ्यासमोर फक्त त्यांचा कबड्डी क्षेत्रातील यशस्वी जीवनपट तरळत होता. होय..! सुदनजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कबड्डीचा एक भक्कम पाया होता. त्यांनी फोंडाघाटचे नाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना परिचित करून दिले होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडाघाटची ओळख कबड्डीची पंढरी म्हणून करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. दरवर्षी १५ ऑगस्टपासून सलग तीन ते चार दिवस कबड्डीचा महोत्सव भरवणारे ते जिल्ह्यातील एकमेव आयोजक होते. त्यांच्या स्पर्धेपासून जिल्ह्यातील कबड्डीचा स्पर्धेचा श्रीगणेशा व्हायचा व त्याची सांगता पुढच्या वर्षीच्या जूनला होत असे. माझ्या माहितीप्रमाणे सलग पस्तीस वर्षे निर्विघ्नपणे एक हाती नियोजनबद्ध स्पर्धा आयोजन करणारे ते एक आदर्श आयोजक होते. या स्पर्धेत खेळण्यासाठी फोंडा पंचक्रोशीतील तमाम कबड्डी खेळाडूंचा स्पर्धेच्या पूर्वी गावागावात कबड्डीचा सराव सुरू असे व त्यानंतरच त्यांचे संघ कबड्डीच्या आखाड्यात उतरत असत. पहिले दोन दिवस ग्रामीण स्पर्धा उरकल्यानंतर, जिल्हा व जिल्ह्याबाहेरील संघांच्या स्पर्धा व्हायच्या. या स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लहानथोर प्रेक्षक व जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू, कार्यकर्ते, हितचिंतक यांची प्रचंड गर्दी होत असे. पावसा पाण्याची तमा न बाळगता खेळाडूंसोबत प्रेक्षक वर्ग सुद्धा या कबड्डी सोहळ्याचा आनंद लुटत असत. ओम साई मित्र मंडळाचे कार्यकर्ते, सुदन बांदिवडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत असत. व्यासपीठावर घेणाऱ्या प्रत्येक लहानथोर व्यक्तींचा खेळाडू व पंचांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सुदनजी न चुकता करत असत. ही कबड्डी स्पर्धा म्हणजे आपल्याच घरातील एक सोहळा असल्याची भावना सर्वांच्या मनात असायची. त्यामुळे ही स्पर्धा व सुदनजी बांदिवडेकर यांच्याशी आम्हा सर्वांचे अतूट ऋणानुबंध निर्माण झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने आज खऱ्या अर्थाने कबड्डीची ही पंढरी पोरकी झाली. कबड्डी स्पर्धेच्या व्यासपीठावर ओळख करून देताना ज्या ज्या वेळी सुदन जी म्हणत आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या फोंडाघाट गावचे सुपुत्र दिनेश चव्हाण कबड्डी क्षेत्रात जिल्ह्याबरोबरच राज्य ,राष्ट्रीय स्तरावर उत्तम योगदान देत आहेत. हे त्यांचे प्रोत्साहन माझ्या कायम स्मरणात राहील. कधीकधी ते गंमतीने म्हणत की आम्ही राजकारणी असलो तरी कबड्डीतील खरे राजकारणी दिनेश चव्हाण आहेत कारण सर्व पक्षातील राजकारण्यांना कबड्डी संघटनेच्या माध्यमातून व्यासपीठावर आणण्याचे काम ते लीलया पेलत आहेत .मला आठवते सन २००६ – ०७ या कालावधीत कणकवली येथे आदरणीय दादांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील गोल्ड कप चषक कबड्डी स्पर्धा आयोजन करण्याचा मान सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनला मिळाला. त्यावेळी सुदनजी बांदिवडेकर यांनी दिलेले योगदान हे आम्ही कधीच विसरू शकत नाही. जवळपास ३० लाखाच्यावर या स्पर्धेचा खर्च, देशभरातून आलेल्या कबड्डी खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था ,वाहतूक व्यवस्था, लाखो रुपयांची बक्षिसे, जिल्हा राज्य व राष्ट्रीय या तिन्ही संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पंच यांचे प्रोटोकॉल व व्यवस्था करणे खूपच मोठे आव्हान होते. आदरणीय दादांनी ज्या आपल्या महत्वाच्या सहकाऱ्यांवर जबाबदारी दिली होती त्यातील एक म्हणजे सुदन जी बांदिवडेकर! त्यावेळी आदरणीय दादांच्या सर्व महत्वाच्या सहकाऱ्यांसोबत काम करत असताना खूप दडपण येत असे. परंतु आज मी सांगू इच्छितो की बांदिवडेकर साहेबांमुळे आम्ही या स्पर्धेचे शिवधनुष्य सहज पेलू शकलो . सुदनजींचे व्यक्तिमत्व एक समाजकारणी! राजकारणी! एक मित्र ! एक कबड्डी कार्यकर्ता! सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस! असे अनेक पैलू ने कोरलेले होते. परंतु मला लाभले होते ते खरे मार्गदर्शक! जिल्ह्यात कबड्डीचे काम करत असताना अनेक समस्या वारंवार येत असत. त्यापैकी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनची राज्य संघटनेच्या माध्यमातून कामकाज करण्याची ची भूमिका असेल , नियमबाह्य वर्तन केल्याबद्दल खेळाडू किंवा पंचां वर केलेल्या कारवाईबाबत असेल ,स्पर्धा आयोजनाबाबत संघटनेची नियमावली असेल, अशा कितीतरी बाबींवर त्यांच्यासोबत माझी चर्चा होत असे .जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू शिस्तप्रिय असावा त्यांचे वर्तन इतर खेळाडूला आदर्शवत असावे असे त्यांचे मत होते. सुदनजी तुमच्या अचानक जाण्यामुळे जीवन क्षणभंगुर आहे याची प्रचिती आली ! ज्या ज्या व्यक्ती तुमच्या संपर्कात आल्या असतील त्यानं त्यानां निश्चित फार मोठा आघात बसला असेल कारण तुम्ही आपल्या परोपकारी व निस्वार्थी वृत्तीने त्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलात, ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे ‘ या उक्तीप्रमाणे तुम्ही आम्हा सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केला आहात .तुमच्यासारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही… कबड्डीतील क्षेत्रातील आपले बहुमूल्य योगदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम आजी माजी खेळाडू पंच पदाधिकारी कार्यकर्ते व व आपले आवडते कबड्डी प्रेक्षक निरंतर आपल्या स्मरणात ठेवतील. आपल्या जाण्याने कबड्डी क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे .आपल्याबद्दल खूप काही मांडायचे आहे , परंतु आपले कार्य एवढे आहे की शब्द अपुरे पडत आहेत …सुदनजी आपल्या स्मृतिस विनम्र अभिवादन

  • दिनेश चव्हाण, कार्यवाह, सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन