जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात सेनेचे लोकप्रतिनिधी अपयशी : परशुराम उपरकर

0
147

कणकवली, दि. १९ : जिल्हयात कोरोनाच्या सुरुवातीला तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सेनेचे पालकमंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बातम्या आणि बैठकांचे फोटो सर्वत्र झळकत होते. परंतु या नियोजन बैठकांचे जनतेला आणि जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणताही लाभ झालेला नाही हे सिंधुदुर्गात सध्या वाढणा-या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिध्द झाले असून जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदार आणि पालकमंत्री जिल्हयातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात अपयशी ठरल्याची टीका मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे. गेले ६ महिने सरकार म्हणून सत्ताधारी आमदार, खासदारांना कोरोनाच्या साथ नियंत्रण करण्यासाठी योग्य नियोजन करता न आल्यामुळे रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे जिल्हयात आतापर्यंत ५५ लोक मृत्युमुखी पडले आहेत. याला जनतेने निवडून दिलेले आमदार, खासदार आणि पालकमंत्री जबाबदार आहेत. सर्वच लोकप्रतिनिधी मोठमोठया घोषणा करतात, वृत्तपत्रांतून बातम्या छापून आणतात व निव्वळ दिखाऊपणा करतात. परवाच आमदार वैभव नाईक यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदार संघामध्ये जाऊन १० व्हेंटिलेटर दिल्याची घोषणा केली. परंतु हे व्हेंटिलेटर आल्यानंतर त्यांना अपुरा कर्मचारी वर्ग देण्याची घोषणा करु शकले नाहीत. त्यामुळे हे व्हेंटिलेटर धूळखात पडण्याची भीती निर्माण झालेली आहे. कारण १० वर्षापुर्वी कणकवली आणि सावंतवाडी येथे ट्रामाकेअर सेंटर सुरु झाले पण त्यांना डॉक्टर्स व कर्मचारी दिलेले नसल्यामुळे ते धूळखात पडले आहेत . त्याचप्रमाणे कुडाळचे महिलांसाठी उभारण्यांत आलेले रुग्णालय ४ महिन्यांत सुरु होणार असे सांगून आ.वैभव नाईक यांनी सदर रुग्णालयाला १ कोटींचा निधी मिळाला असल्याची घोषणा केली ते वृत्त वृत्तपत्रांतून छापून आणले गेले . त्यानंतर मंत्र्यांकडे जाऊन त्यासाठी निधीची मागणी केल्याचे फोटो छापून आणण्यात आले . व जर निधी आला असेल तर पुन्हा मागणी करण्याची गरजच काय होती ? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे . अशी जनतेची फसवणूक करुन निवडून देणा-या जनतेला हे लोकप्रतिनिधी फसवित आहेत. त्याचबरोबर मालवण रुग्णालयामध्ये पुरेसे डॉक्टर्स उपलब्ध करुन देण्यांच्या घोषणा वारंवार
करण्यात आल्या होत्या. परंतु, मालवणसारख्या रुग्णालयामध्ये एकमेव डॉक्टर २४ तास काम करीत आहेत . मालवणच्या डायलेसिस सेंटरचे उदघाटन करण्यात आले होते. परंतु ते आजमितीस बंद अवस्थेत पडले आहे. यापुर्वी जिल्हयामध्ये डॉक्टर्स कमी पडत असल्याने बीएमएस डॉक्टर नेमण्याची घोषणा केली होती. त्यापैकी किती डॉक्टर हजर झाले त्यांचा आढावा अदयापपर्यंत घेतलेला नाही . जिल्हयात कोरोना जाण्यासाठी उपाययोजनांवर ४० कोटी खर्च केले असे सांगणा-या या लोकप्रतिनिधींनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दिले जाणारे जेवण कसले दिले जात होते व पिण्याचे पाणी कोणत्या प्रकारचे दिले जात होते आणि दाखल केलेल्या रुग्णांची हालत कशी काय आहे हे कधी पाहण्याची व सुधारणा करण्याची त्यांना गरज भासली नाही. परंतु या ४० कोटी रक्कमेचे काय झाले ? हे जनतेच्या माहितीसाठी जाहिर करावे. लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिका – यांना स्वतंत्र बिल्डिंगमध्ये ठेवून व्हीआयपी सुविधा असताना ज्या जनतेने त्यांना निवडून दिले त्यांची जिल्हा रुग्णालयामध्ये काय हालत झाली आहे व त्यांच्या नातेवाईकांची कशी ससेहोलपट होत आहे हे बघण्याचे सौजन्य लोकप्रतिनिधींनी दाखवलेले नाही . परंतु महाराष्ट नवनिर्माण सेनेने गेले ६ महिने वारंवार जिल्हा रुग्णालयाशी आणि वरिष्ठांशी पत्रव्यवहार करुन आणि आंदोलने करुन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले . व जिल्हा रुग्णालयासमोर मनसैनिकांनी आंदोलन केले व त्यानंतर रुग्णांच्या जेवणामध्ये सुधारणा करण्यांत आली , स्वच्छतागृहांची डागडुजी करण्यांत आली , रुग्णांना गरम पाण्याची व्यवस्था , जिल्हा रुग्णालयात मृत रुग्णांचे दहन करण्यासाठी लाकडांची व्यवस्था , टॉयलेट – बाथरुममध्ये स्वच्छता , अशाप्रकारच्या सुधारणांना सुरुवात झाली आहे . मनसे रस्त्यावर उतरल्यामुळे ही सुधारणा होऊ शकते तर आमदार – खासदार व पालकमंत्री गेले ६ महिने काय करीत होते ? त्यामुळे या लोकप्रतिनिधिना निवडून देणा – या जनतेशी देणेघेणे नाही असे दिसून आले आहे . पालकमंत्र्यांनी हायवेचे पैसे २ दिवसांत देण्यांची घोषणा केली होती त्याचे काय झाले ? ८ दिवसांत हायवेचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन देणार होते त्याचे काय झाले ? रुग्णालयात कर्मचारी नेमण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले ? विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी व स्मारके उभारण्याची घोषणा पालकमंत्री आणि खासदारांनी केली. परंतु शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना वेगवेगळया कामांच्या घोषणा करुन जनतेची दिशाभूल करुन वृत्तपत्रातून बातम्या व फोटो छापून जनतेला विकास झाल्याचे सांगण्याचा खोटा प्रयत्न का केला जात आहे ? असा परखड सवाल मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.