सिंधुदुर्गात ओला दुष्काळ जाहीर करावा : रणजीत देसाई

0
324

कुडाळ, दि. २५ : संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे भातशेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोनामुळे अर्धमेल्या झालेल्या शेतकऱ्यांना आता या अस्मानी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. काही ठिकाणी तर ही नुकसानी पूर्णपणे झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत आणि जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच या सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई सुद्धा द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी केली आहे. याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन लवकरच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी अक्षरशः कुजायला लागली आहे. कोरोनाच्या कालावधीत अनेक सुशिक्षित बेरोजगार, चाकरमानी आणि शेतकरी वर्गाने आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनीवर शेती केली होती. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भातशेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. जिल्ह्यातील शेतकरी हा आपल्याला संपूर्ण वर्षभर लागणारे तांदूळ आणि इतर धान्य हे स्वतःच्या शेतातच पिकवतात व त्यावर त्यांची गुजराण चालते. स्वतःचा उदरनिर्वाह करता लागणारे धान्य राखून उर्वरित सर्व धान्य हे विक्री करून त्यातच त्यांचा वर्षभराचा संसार चालतो. मात्र, दुर्दैवाने गेल्या महिन्याभरात वारंवार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या सर्वांचे तोंडचे पाणी पळाले आहे. तसेच सकाळी पडत असलेल्या पावसामुळे फुलोऱ्यावर असलेल्या भातपिकाच्या परागसिंचनावर दुष्परिणाम होऊन दाणे भरण्याच्या प्रक्रीयेवर परीणाम होऊन ‘पोल’होऊन शेतकऱ्यांचे अपरीमित नुकसान होणार आहे. अनेक ठिकाणी भातशेती ही पाण्याखाली असून काही ठिकाणी तर जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी मागणी त्यांनी केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.