गाव हेच विकासाचे केंद्रस्थान : ब्रिगे. सुधीर सावंत

0
340

सिंधुदुर्गनगरी, दि. ०५ : सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानद्वारे ‘नैसर्गिक शेतीची मूलतत्त्वे आणि विविध पद्धती या विषयाची पाच दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. गांधी जयंतीच्या औचित्याने या कार्यशाळेचे उद्घाटन कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणार्थींंना ब्रिगे. सुधीर सावंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या देशाचा विकास करण्यासाठी गावांचा विकास होणे गरजेचे आहे. गाव हेच विकासाचे केंद्रबिंदू मानून काम करावे लागेल. गावागावात समृद्धी आली तरच देश समृद्ध होईल. म्हणून कृषि प्रतिष्ठान द्वारे मालवण व कुडाळ तालुक्यातील १४ गावामध्ये ‘समृद्ध गाव’ कार्यक्रम राबवित आहोत. विशेष करून समृद्ध गावातील लोकांचा सर्वांंगिण विकास झाल्यास जनजीवन आनंदी व समृद्ध होईल. कृषि प्रतिष्ठानद्वारे ब्लॅक राईस, पालेभाज्या, फळभाज्या, भुईमूग, नाचणी, हरीक, कांग लागवड,कुक्कुटपालन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले आहेत. नैसर्गिक शेती द्वारे गाव समृद्ध करण्याचा मानस त्यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केला. नैसर्गिक शेतीच्या कार्यशाळेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जिल्हा बँक शेतकर्‍यांच्या सदैव मदतीसाठी कार्य करीत आहे आणि कृषि प्रतिष्ठानचे अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत ‘नैसर्गिक शेतीचा’ एक स्तुत्य व नितांत गरज असलेल्या विषयात भरीव काम करत आहेत. त्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले मी स्वत: शेतकरी असून नैसर्गिक शेतीच्या चळवळीमध्ये कृषि प्रतिष्ठानला सर्वतोपरी जिल्हा बँकेद्वारे सहकार्य करीन असे आश्वासन दिले. येत्या हंगामात कृषि प्रतिष्ठान द्वारे ब्लॅक राईसचे प्रयोग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यास सर्वतोपरी सहकार्य करणार असे म्हणाले. कृषि विज्ञान केंद्र, छ. शि. कृषि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आशिष पाटील व त्यांचे सहकारी प्राध्यापक व कर्मचारी यांनी कार्यशाळेचे आयोजन केले. कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी नैसर्गिक शेतीचे परिपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत होते. या कार्यक्रमास कृषि प्रतिष्ठानचे सल्लागार श्रीमती. निलम दळवी, बाळू मेस्त्री, भास्कर राणे, माजी कृषि सभापती संदेश पाटील उपस्थित होते. शिबिराचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने केले असून महाराष्ट्रातून १४२ प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदवला आहे.

  
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.