लुपिनच्या माध्यमातन ‘शेततळ्यातील मत्स्यशेती’ प्रशिक्षण

0
335

सावंतवाडी, दि. ०६ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील मत्स्यसंशोधन आणि संवर्धन प्रकल्प आणि लुपिन ह्युमन वेलफेअर आणि रिसर्च फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शेततळ्यातील मत्स्यशेती या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. मुळदे येथे शोभिवंत मत्स्यपालन प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील निवडक २० शेतक-याकरिता ही कार्यशाळा पार पडली. शेतक-यांचे उत्पादन दुप्पट करण्याच्या संकल्पेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मागेल त्याला शेततळी या योजनेअंतर्गत सुमारे ४५० शेततळ्यांची निर्मीती विविध तालुक्यात झालेली असून सध्या ती बंद अवस्थेत आहेत. या शेततळ्यांचे पुनरुज्जीवन करून शेतक-यांचे उत्पन्न सरासरी रूपये ७० हजार प्रती एकर वस्न रूपये १.५० लाख प्रती एकर पर्यंत वाढविण्याच्या उद्दिष्टाने लुपिनच्या माध्यमातून ‘शेततळ्यातील मत्स्यशेती प्रशिक्षणाची मोहिम राबविण्यास या कार्यशाळेद्वारे सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या कार्यशाळेला मालवण, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यातील सुमारे २० निवडक शेतक-यांना प्रवेश देण्यात आला होता. येत्या दोन महिन्यात आणखी सुमारे १०० शेतक-यांना अशाच प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच्या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. प्रदिप हळदवणेकर, लुपिन फाऊंडेशन, सिंधुदुर्गचे प्रकल्प व्यवस्थापक, योगेश प्रभ, कार्यशाळेचे समन्वयक तथा मत्स्यशास्त्रज्ञ, डॉ. नितीन सावंत, कुंदे गावचे सरपंच, सचिन कदम, लुपिन फाऊंडेशनचे कृषि अधिकारी, प्रताप चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी या कार्यक्रमाचे महत्व विषद करून येत्या काळात शेती व्यवसाय फायदेशीर करण्याकरिता अशा संकल्पना शेतक-यांनी स्विकारल्या पाहिजेत आणि शेतीतील जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून उत्पादन दुप्पट करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत. तसेच या शेतीस सामूहिक शेतीची जोड दिली पाहिजे असे नमुद केले. तांत्रिक सत्रात केंद्राचे डॉ. नितीन सावंत, डॉ. मनोज घुसकर, कृपेश सावंत, विनय सहस्रबुध्दे यांनी शेततळ्यातील मत्स्यशेतीच्या विविध तांत्रिक बाबी सहभागी शेतक-यांना व्याख्यान व प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर समजवून सांगितल्या. येत्या काळात या सर्व शेतक-यांच्या शेततलावात १ हजार मत्स्यबीज लुपिन फाऊंडेशनच्या वतीने मत्स्यसंवर्धनाचा कार्यक्रम कार्यान्वित केला जाणार आहे. आजची कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता मत्स्यसंशोधन प्रकल्पाच्या सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच लुपिनचे फाऊंडेशनचे कृषि अधिकारी प्रताप चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.