गोळीने जखमी होण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपाची निर्दोष मुक्तता

0
386

कणकवली, दि. ०७ : कणकवली गैरकायदा विनापरवाना काडतुसची बंदूक वापरून शिकारीला गेले असताना जंगली जनावराच्या दिशेने घातलेल्या गोळीतील छरे लागून दोघांच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हरकुळ खुर्द येथील राजेंद्र काशिनाथ डिचोलकर यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस . ए . जमादार यांनी निर्दोष मुक्तता केली . आरोपीच्यावतीने अॅड उमेश सावंत यांनी काम पाहिले . २३ फेब्रुवारी २०१६ रोजी राजेंद्र डिचोलकर , संदीप खानविलकर , रा . हरकुळ खुर्द व बावशी येथील सुभाष रांबाडे हे शिकारीसाठी बावशी शेळीचीवाडी येथे राप्ती ९ वा . गेले होते . यावेळी राजेंद्र डिचोलकर यांनी काळोखात जंगली जनावराच्या दिशेने बार काढला . यावेळी शिकारीसाठी झुडपात लपलेल्या संदीप खानविलकर व सुभाष रांबाडे यांनी झुडपात हालचाल केल्याने शिकार समजून घातलेल्या गोळीतील काही छरे दोघांनाही लागून ते गंभीर जखमी झाले . याप्रकरणी पोलीस पाटील विजय मुकुंद मोर्ये रा . तोंडवली बोभाटेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र डिचोलकर याच्याविरूद्ध भादंवि कलम ३३७ , ३३८ , भारतीय हत्यार अधिनियम कलम ३/२५ , बारी पदार्थ अधिनियम १८८४ चे कलम ९ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता . गुन्ह्याच्या तपासात आरोपीकडून विनापरवाना बंदुक व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले होते . तसेच आरोपी हा नियमित शिकारी असल्याचे साक्षीदारांच्या साक्षीत निष्पन्न झाले होते . याप्रकरणी पाच साक्षीदारांच्या साक्षी झाल्या . आरोपीने गैरकायदा विनापरवाना काडतुस बंदूक बाळगल्याचे तसेच बारी पदार्थ बाळगल्याचे सिद्ध न झाल्याने , तसेच बंदूकीतून बार उडून दुखापत झाल्याचे सिद्ध न झाल्याने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.