मायकल लोबोंच्या ‘त्या’ वक्तव्याचा सुरेल तिळवेंनी घेतला समाचार

0
214

पणजी, दि. १३ : आम आदमी पक्षाने कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्या विधानावर आक्षेप घेताना त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे. लोबो यांनी असे म्हटले होते की दीन दयाल स्वास्थ्य सेवा योजनेमध्ये खासगी कोविड उपचारांचा समावेश केल्यास खासगी हॉस्पिटल्सवरील ‘ओझे’ वाढेल. या विधानाला आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला होता. या विषयी बोलताना आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुरेल तिळवे म्हणाले, “माजी लोकायुक्त यांनी मायकल लोबो यांच्यावर टिप्पणी करताना योग्य तेच म्हटले होते. लोबो हे मंत्री होण्यास नालायक असून लोबो यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना सर्वसामान्य गोवेकर नागरिकांचे काहीही पडलेले नाही हे सिद्ध होत आहे. बहुतेक मंत्र्यांनी खासगी हॉस्पिटलांमध्येच उपचार घेतलेले आम्ही पाहिले पण सर्वसामान्य गोवेकरांनी याच खासगी इस्पितळाची सुविधा घेतली तर या मंत्र्यांना अडचणीचे होते”. आम आदमी पक्षाची मागणी अशी आहे की कोविडचा खासगी हॉस्पिटलमध्ये केलेल्या उपचाराचा समावेश दीन दयाल स्वास्थ्य सेवा योजनेमध्ये करण्यात यावा जेणेकरून ही सुविधा प्रत्येक गोवेकराला बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी ठरेल. “यामागे मायकल लोबो यांचा काहीतरी स्वार्थ असल्याचे दिसून येते. ज्या तऱ्हेने त्यांनी योजनेचा समावेश रद्द केल्याच्या अधिसूचनेचे उत्साहाने स्वागत केले, त्यावरून त्यांच्या मनातला उद्देश स्पष्ट झालेला आहे. हातातील नोकरी आणि उद्योग गेल्यामुळे आधीच तणावाखाली असलेल्या गोवेकरांना कोविड उपचाराचा भरमसाठ खर्च जखमेवर मीठ चोळणारा ठरला आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये क्षमता मर्यादित असते हे आम्हा सर्वांना माहिती आहे. त्यामुळे परवडणाऱ्या खर्चामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये सुविधा देणे ही काळाची गरज होती आणि त्यामुळे दीन दयाल स्वास्थ्य सेवा योजना हे एक स्वागतार्ह पाऊल होते ” असे सुरेल तिळवे म्हणाले. मायकल लोबो यांनी कॉर्पोरेट शक्तींनी चालविण्यात येणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सची बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य गोवेकर नागरिकांच्या समस्यांबाबत जास्त बोलते व्हावे, अशी आपण आशा करूया. ज्या लोकांनी मते देऊन त्यांना निवडून आणले अशा लोकांबाबत लोबो यांनी जबाबदारीने वागण्याची हीच वेळ आहे. जनतेला लोबो हेच उत्तरदायी आहेत, असे तिळवे यांनी म्हटले आहे.