शहीद वडिलांच्याच बटालियनमधून आता मुलगा करणार देशसेवा

0
556

मुझफ्फरनगर : १२ जून १९९९ साली राजपूतना रायफल्सच्या बटालियन २ मध्ये कार्यरत असलेले जवान बचान सिंह कारगिलच्या तोलिलिंगमध्ये शहीद झाले होते. त्यावेळी बचान सिंह यांचा मुलगा हितेश कुमार फक्त सहावर्षांचा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर हितेशने मोठं होऊन लष्करात जाण्याची शपथ घेतली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. वडिलांच्या निधनानंतर १९ वर्षांनी हितेश भारतीय लष्करात लेष्टनंट पदावर रुजू झाला आहे. देहराडूनमधील इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून ट्रेनिंग पूर्ण करून हितेश लष्करात रूजू झाला आहे. इतकंच नाही,तर हितेश याला त्याच्या वडिलांच्याच बटालियनमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. पासिंग आऊट परेडनंतर हितेशने त्याच्या वडिलांना आदरांजलीही वाहिली.’लष्करात रूजू व्हायचं हेच स्वप्न १९ वर्ष उराशी बाळगलं होतं. माझ्यामुळे माझ्या आईचंही तेच स्वप्न होतं. आता गर्वाने व प्रामाणिकपणाने मला माझ्या देशाची सेवा करायची आहे’, अशी भावना हितेशने व्यक्त केली आहे. ‘बचान शहीद झाल्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य दोन मुलांना अर्पण केलं. हितेश आज लष्करात गेल्याचा मला अभिमान आहे. हितेशचा लहान भाऊसुद्धा लष्कराच जाण्याची तयारी करतो आहे’, अशी भावना हितेशच्या आईने व्यक्त केली. ‘बचान आमच्या बटालियन मधील शूर सैनिक होते. बटालियनवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या डोक्याला गोळी लागून जागीच त्यांचा मृत्यू झाला. आम्ही आमचे १७ सैनिक गमावले. आज मुलाचं हे यश पाहून बचान यांना अतिशय आनंद झाला असेल, असं बचान यांच्या बटालियन मधील रिशीपाल सिंह यांनी म्हटलंय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.