सिंधुपूत्र जवान मिलिंदचा आकस्मिक मृत्यू ; जिल्ह्यावर शोककळा

0
4583

मुंबई, दि. २४ : भारतीय सैन्य दलात पंजाबच्या जालंधर इथं जवान मिलिंद नामदेव ठुंबरे यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ते ३७ वर्षांचे होते. जवानांची परेड सुरू असताना अचानक चक्कर येऊन ते कोसळले. लागलीच त्यांना पंजाबच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचारांची पराकाष्ठा करण्यात आली. मात्र मंगळवारी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तुळस गावचे रहिवासी असलेल्या नामदेव आणि सत्यवती ठुंबरे यांचे ते पुत्र होते. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव ठाकुर्ली-खंबाळपाड्यातल्या शंखेश्वर पार्क येथे राहत्या घरी आणण्यात आले. त्यावेळी आई सत्यवती आणि वडील नामदेव यांनी आक्रोश केला. ३० वर्षीय पत्नी मानसी हिने तर पतीचे पार्थिवपाहून हंबरडाच फोडला. यावेळी तिसऱ्या इयत्तेत शिकणारी ७ वर्षीय दिव्या आणि नर्सरीत शिकणारी वर्षीय स्वरा या त्यांच्या निरागस चुमुरड्यांनाही पित्याचे अंत्यदर्शन घेताना शोक अनावर झाला होता. यावेळी उपस्थित साऱ्यांचेच डोळे पाणावले होते. यावेळी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी तथा डोंबिवलीतील विद्या निकेतन संस्थेचे संस्थापक विवेक पंडित, स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे फिजिकल डिस्टन्स ठेऊन उपस्थित नागरिकांनी साश्रुनयनांनी या वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. तर लष्कराचे नायब सुभेदार अखिलेश चौधरी आणि जवान भगवान शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात पाथर्लीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.