भारताची आधुनिक मंदिरे ; चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशन लि.

0
554

तामिळनाडूच्या पेट्रोलियम उद्योगाची जननी ‘चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशन लि. CPCL च्या जन्माची कहाणी.

स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने दक्षिण भारतात पेट्रोलियम रिफायनरी कंपनी उभारण्याचे ठरविले. केंद्र सरकारने त्याकरिता दक्षिण भारतातील बलशाली नेते व तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री कामराज यांचेकडे विचारणा केली की कोणत्या राज्यात ही रिफायनरी उभारावी?

आपल्या राज्याला मिळालेली अशी सुवर्णसंधी गमावणाऱ्या नेत्यांपैकी कामराज नव्हते. पेट्रोलियम उत्पादनात तामिळनाडू राज्याला अग्रभागी आणण्यासाठी मग कामराज यांनी कंबर कसली. त्यांनी तातडीने भारताच्या पूर्व किनार्‍यावर तेव्हाच्या मद्रास व आताच्या चेन्नई शहरानजीक, रिफायनरी करिता योग्य जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी चेन्नईच्या उत्तरेला रिफायनरी करिता सुयोग्य जागा असल्याचा निर्वाळा दिला. परंतु ही जमीन सरकारी नव्हती. यापैकी शेकरो एकर जमीन मनाली गावचे जमीनदार श्री रामकृष्ण मुदलियार यांच्या कुटुंबीयांच्या वडिलोपार्जित मिळकती पैकी होती.

मुख्यमंत्र्यांना ही जमीन प्रकल्पाकरिता खरेदीद्वारे हवी होती. त्यांनी याकरिता स्वतः रामकृष्ण मुदलियार यांची भेट घेण्याचे ठरविले व तसा निरोप आपल्या अधिकाऱ्यांना श्री मुदलीयार यांना देण्यास सांगितला. भेटीची व्यवस्था ठरली. श्री रामकृष्ण मुदलियार, लोकनेते व मुख्यमंत्री श्री कामराज यांना भेटावयास आले.

श्री कामराज, श्री मुदलियार यांना म्हणाले ‘साहेब एक सुवर्णसंधी आपल्या राज्याला प्राप्त झाली आहे. आपण मनात आणाल तर ती या राज्याला घेता येईल अन्यथा ती दुसऱ्या राज्यात जाईल.

त्याकरिता आपण आपली जमीन राज्याला विकत देऊ शकाल का?

श्री मुदलीयार यांना धक्का बसला, मुख्यमंत्री देशाकरिता आपली जन्मभूमी आपल्याकडे मागत आहेत. ही जमीन शेकडो एकर असून सर्व कुटुंबाची केवळ वडिलोपार्जित जमीन नव्हती तर त्यांच्या सर्व कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन देखील होती व समाजामध्ये जमीनदार ही पारंपारिक बिरुदावली मिरवण्याचे एक मानक देखील होती.

लोकनेते श्री कामराज नाराज होणार नाहीत अशा पद्धतीने श्री मुदलीयार यांनी आदर भावाने परंतु संयमित रित्या ही जमीन देता येणार नाही असे मुख्यमंत्र्यांना सूचित केले.

आपली वडिलोपार्जित कौटुंबिक मालमत्ता कोणीही सार्वजनिक कार्यासाठी अशी सहजासहजी देणार नाही या मानवी मनाचे कंगोरे ओळखणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कामराज सारख्या महान नेत्याने मात्र आपला आग्रह सोडला नाही.

त्यांनी परत मुदलियार यांना सांगितले ‘साहेब मी परत आपल्याला आग्रह करणे चुकीचे ठरेल परंतु आपण पुनर्विचार करा. आपल्या एका निर्णयामुळे तामिळनाडू राज्य प्रगतीकडे वाटचाल करेल. शेकडो-हजारो कुटुंब प्रगती करतील. हा मागास ग्रामीण भाग आर्थिक उन्नतीकडे झेपावेल. तुम्ही आपल्या कुटुंबियांशी चर्चा करा. हा देश तुमच्या सकारात्मक भूमिका व शब्दांची वाट पाहत आहे. मी आपल्याला वारंवार देत असलेल्या तसदीबद्दल क्षमस्व’.

श्री मुदलियार घरी आले. त्या रात्री त्यांना झोप आली नाही ते या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिले. वडिलोपार्जित एवढी मोठी जमीन कशी द्यायची? हा त्यांना प्रश्न पडला होता.

अचानक त्यांच्या मनात एक विचार आला. एवढा मोठा बलशाली नेता आपल्याला विनंती करतो आहे. त्यांनी जर मनात आणले असते तर एका फटक्यात ही जमीन त्यांना ताब्यात घेता आली असती. परंतु त्यांनी तसे न करता सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांची जाणीव ठेवली. आपल्याकडे विचारणा केली. विनंती केली. ‘आपली जमीन देऊ शकलात तर द्या, आपल्याला देत असलेल्या तसदीबद्दल क्षमस्व….’ अशी भाषा वापरली. यामागे त्यांचा स्वतःचा तर कोणताच स्वार्थ नाही. ते जे काही मागत आहेत ते देशा करिता… तामिळनाडूमधल्या गरीब कुटुंबां करिता….

श्री मुदलियार यांना प्रश्न पडला ‘की देशाकरिता व गरिबांकरिता इतरांपुढे हात पसरणाऱ्या नेत्याला जर मी मदत केली नाही तर मी काय स्वरूपाचा माणूस आहे?’

ही जमीन जर माझ्या ताब्यात राहिली तर माझ्या कुटुंबाचे भरण पोषण होईल, परंतु ही जमीन जर सरकारकडे गेली तर हजारो कुटुंबे सुखी-समाधानी होतील.

ठरलं तर, श्री मुदलियार यांनी दुसऱ्या दिवशी लवकरच उठून मुख्यमंत्र्यांकडे प्रस्थान केले. त्यांनी जवळपास चार तास मुख्यमंत्री यायची वाट पाहिली. जेव्हा मुख्यमंत्री आले तेव्हा त्यांनी श्री मुदलियार यांना पाहिले. कालच नकार ऐकलेल्या मुख्यमंत्र्यांना, मुदलीयार समोर दिसल्यावर वाटून गेले की हे लगेचच परत आले म्हणजे कुटुंबीयांकडून सल्लामसलत करून नकार कळविण्यास आले असावेत. मुख्यमंत्री थोडे खट्टू झाले.

श्री मुदलीयार मिळाले ‘सर मला माफ करा. आपले उच्च विचार काल मला समजले नाहीत. परंतु आज मी प्रार्थना करतो की आपल्या दूरदृष्टीला परमेश्वर यश देवो…. मी व माझे कुटुंबीय, मनाली तील आमची सर्व जमीन या प्रकल्पाकरिता सरकारला देण्यास तयार आहोत.’

श्री कामराज यांनी तात्काळ आपल्या खुर्चीवरून उठून श्री मुदलीयार यांना अलिंगन दिले, त्यांच्या गालावर अश्रू ओघळले. त्यांनी अगदी मनापासून श्री मुदलियार व त्यांच्या कुटुंबीयांचे आभार मानले.

सरकारी कर्मचाऱ्यांना भराभर आदेश देत त्यांनी पुढील कारवाई सुरू केली व केंद्र सरकारला कळविण्यास सांगितले.

मित्रांनो आपल्या निस्पृह वर्तनाने श्री कामराज या थोर नेत्याने चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशन चा पाया तामिळनाडू राज्यात रचला. आज हजारो कुटुंबीय त्याचा फायदा घेत आहेत. त्याचे सर्व श्रेय या द्रष्ट्या नेत्याला जाते. चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशन आज दक्षिण भारतात इंधन पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक सरकारी तेल कंपनी आहे. तीला दक्षिण भारतातील इंधनाची जीवनदायिनी म्हणण्यास हरकत नाही. चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशन लि. ने परिसराच्या विकासाला देखील फार मोठा हातभार लावला आहे.

रिफायनरी सारखी भारताची आधुनिक औद्योगिक मंदिरे निर्माण करणाऱ्या व देशासाठी अखंड कार्यरत असणाऱ्या श्री कामराज सारख्या द्रष्ट्या नेत्याला विसरता कामा नये.

लोकनायक श्री कामराज यांना माझा सलाम..!

अनिल नागवेकर : रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे पीआरओ

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.