आम्ही न्याय कुणाकडे मागायचा ?

0
154

कुडाळ : दि. ३० : ‘आम्ही चौपदरीकरणासाठी आमची जमीन दिली. मात्र आज या प्रकल्पामुळे आमच्यावरच विस्थापित होण्याची वेळ आली आहे. जागा ताब्यात घेण्यापूर्वी ६० दिवसाची नोटीस देणे आवश्यक आहे. ती न देताच जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कारवाई करत आहे. याबाबतीत स्थानिक प्रशासनाने कानावर हात ठेवले. त्यांनी हतबलताच दर्शवली आहे. मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचा ? असे अनेक प्रश्न राज हॉटेल जवळील बॉक्सवेल मुळे उभे ठाकले आहेत. या समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्रकल्पग्रस्त व्यावसायिकांनी कुडाळचे प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची भेट घेतली, असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त व्यावसायिक दीपक कदम यांनी सिंधुदुर्ग लाईव्ह बोलताना दिली.
या सर्व प्रश्नांबाबत वरीष्ठ स्तरावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी खरमाळे यांच्या कडे मागणी केली. त्यांच्या विनंतीचा मान राखत खरमाळे यांनी रत्नागिरी येथील राष्ट्रीय महामार्गाचे विभागिय कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्याशी चर्चा केली. याबाबत अधिक चर्चा ५ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती कदम यांनी दिली. या समस्याकडे लक्ष न देता निर्ढावलेल्या महामार्ग प्राधिकरणाने काम रेटून नेण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले. प्राधिकरणाने जागा ताब्यात घेण्यापूर्वी जे सोपस्कार असतात ते पूर्ण न करताच जागा ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. नियमानुसार आम्हाला ६० दिवसांची मुदतीची नोटीस बजावणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या या प्रक्रियेला आमचा विरोध आहे. याबाबत ५ रोजी चर्चा होईल. या बैठकीला मंदार परुळेकर, रत्नाकर प्रभू, कुणाल कोचरेकर, महादेव परब, काका कुडाळकर, राजू राऊळ, राजन नाईक, संजय पिंगुळकर आदी उपस्थित होते,.अशी माहिती कदम यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.