सुशील चिंदरकर म्हणजे सेनेतील जोकर : वरूणेश्वर राणे

0
404

कुडाळ : दि. ०४ : रणजित देसाई यांनी जिल्ह्यात एक शांत संयमी आणि लोकांच्या मनावर आपल्या स्वकर्तृत्वाने आदराचे स्थान मिळवलेले आहे. त्यांच्या कार्यातून हे वेळोवेळी जिल्ह्यातील जनतेला दिसून आले आहे, आणि त्याचा सर्वात मोठा फटका वैभव नाईक यांना मागील निवडणुकीत बसला. फक्त आठ दिवसात हे चिंदरकरांचे भाग्यविधाते, जे मी घरी बसून पण देसाईंविरुद्ध निवडून येईन अशी भीमगर्जना करत होते, त्यांना रात्रंदिवस पायाला चाक लावून फिरावे लागले, त्यांना आपले स्वतःचे भाग्य उजळवून घेण्यासाठी “भाग्यविधाते” म्हणविणारे हास्यास्पद वक्तव्य करून चिंदरकरनी जोकरची भूमिका करू नये. हा त्यांना आमचा मित्रत्वाचा पुन्हा एकदा सल्ला असल्याचे वरूणेश्वर राणे यांनी म्हटलय.

नारायण राणे यांनी कुडाळमध्ये जिल्ह्यातील महिलांसाठीचे हॉस्पिटल २०१३ मध्ये मंजूर करून भूमिपूजन केले व इमारत बांधकाम सुरू होऊन ते आज पूर्णत्वालाही गेले. फक्त राणे साहेबांना त्याचे श्रेय द्यावेच लागेल, या भीती आणि असूयेपोटी आजपर्यंत ते सुरु करू न शकलेल्याना कोणाचे भाग्यविधाते म्हणायचे? औषधोपंचारांवाचून तडफडणाऱ्या मायभगिनी तुमच्या भाग्यविधात्याला दिसत नाहीत का? हा सर्वच महिलांवर सरळसरळ अन्यायच आहे. हुमरस प्रकरणात स्वतःच्याच पक्ष परिवारातील महिलेवर अन्याय अत्याचार झाले असताना तोंडावर आणि डोळ्यावर पट्टी मारणारे नक्की कोणाचे भाग्यविधाते म्हणून वावरत होते हे पण चिंदरकरांनी स्पष्ट करावे अस राणे यांनी म्हटलंय.

चिपी विमानतळ, सी वर्ल्ड सारखे प्रकल्प आज सुरु न झाल्यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध करू न शकलेले भाग्यविधाते कसे? याउलट, रणजित देसाई यांनी कृषीमधून किती तरी महिला व युवकांना आर्थिक प्रगतीचा मार्ग दिला. शेतकरी व महिला बचत गटांना यशाचा मार्ग देणारा कृषी महोत्सव वेळोवेळी यशस्वी करून दाखवत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी आधुनिक शेतकरी बनवले. विकासाची दृष्टीच नसलेल्या तुमच्या तथाकथित भाग्यविधात्याना मंत्री पद न देता दुसऱ्या जिल्ह्यातून पर्याय देण्यात आला. दुसऱ्याचे भाग्य पुसण्याच्या नादात तेलही गेले आणि तूपही गेले, हाती फक्त रत्नागिरीचे धुपाटणे आले.

जिल्ह्याला मिळणारे हक्काचे पालकमंत्रीपद घालवण्याचे काम तुमच्या भाग्यविधात्यांच्या राजकारणामुळे झाले. याची खंत इथले तुमच्याच पक्षाचे माजी पालकमंत्री स्वतः बोलुन दाखवतात आणि या जिल्ह्याचे भाग्य काही जणांनी आपल्या हाताने पुसल्याचे मत व्यक्त करतात, हे लक्षात घ्यावे. व्यक्तीगत भाग्य खुलण्यासाठी उगाचच लाळघोटेपणा करत एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्यासाठी खालच्या पातळीचे राजकारण करणे आता तरी शिवसेनेने बंद करावे. तुमचे भाग्यविधाते जरूर तुमच्या घरात पूजा, पण चिखलफेकीचे राजकारण आता बंद करा. राजकारण करून स्पर्धा करायची असेल तर विकासाची करा, ते जमत नसेल तर तुमच्या नेत्यांसारखेच घरात गप्प बसा. राजकीय वातावरण बिघडवण्यासाठी जर बदनामीच्या षडयंत्राची घाणेरडी राजकारणे खेळू पाहाल, तर ते मोडून घालण्यासाठी यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल याची जाणीव ठेवा, उगाच आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असा खणखणीत इशारा भाजपाचे कुडाळ युवा मोर्चा अध्यक्ष श्री वरूणेश्वर राणे यांनी दिला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.