सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांना मानाचा ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ जाहीर

0
207

सिंधुदुर्ग : दि २२ : ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ जाहीर झालाय. कोरोनासारख्या महामारीत लॉकडाऊन काळात गोरगरीब मजूर, असहाय्य परप्रांतीयांना अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या चित्रपट श्रुष्टीतील कलाकार, मिडिया क्षेत्रातील संपादक, पत्रकार, संशोधक, एनजीओ आदी क्षेत्रातील व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार बहाल करुन सन्मानित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड २०२०’ च्या ट्रॉफीचं नुकतेच अनावरण करण्यात आलंय. या पुरस्काराच वितरण सोमवारी २३ नोव्हेंबरला रोजी सायं. ५ वाजता मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील हॉटेल पेनीन्सूला इथं मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच आयोजन दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्मकडुन कल्याणजी जाणा यांनी केलंय.

 ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड २०२०’ च्या ट्रॉफीचं अनावरण करताना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पुरस्काराचे आयोजक कल्यानजी जाना आदि मान्यवर 

कोरोना महामारीत विशेषत: लॉकडाऊन काळात कोकणच महाचॅनेल ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ ने बातम्यांच्या पलीकडे जाऊन विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक आणि शेतीविषयक उपक्रम राबविलेत. जेव्हा मार्च महिन्यात पहिलं लॉकडावून जाहीर झालं त्याच दिवसापासून ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे एडिटर इन चीफ सागर चव्हाण आणि त्यांची टीम मैदानात उतरली. सर्वप्रथम लॉकडावूनच्या पहिल्या दिवशी कोकणात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम हाती घेतला. सुमारे दोन हजारहून अधिक परप्रांतीय मजुरांना त्यांच्या झोपडीत जाऊन अन्नदान केल. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अर्सेनिक आल्बम गोळ्यांसह मास्कच मोफत वाटप केल.

त्यानंतर ज्या आरोग्य सेविकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची सेवा केली अशा सिस्टरसाठी लुपिन फाऊंडेशन सारख्या समाजसेवी संस्थेला सोबत घेऊन सिस्टर डे च्या दिवशी ‘थॅॅंक्यू सिस्टर’ हा उपक्रम राबविला. सर्व सिस्टर्सना प्रत्यक्ष भेटून गुलाब देत त्यांना ‘थॅंक्यु सिस्टर’ बोलुन त्यांच्या कामाला सलाम ठोकला. तसेच त्यांना भेटवस्तू, अर्सेनिक आल्बम गोळ्या, मास्क देऊन त्यांना कामाला प्रोत्साहन दिलं.

कोरोनाकाळात उपासमारी होऊ नये म्हणून कृषी क्षेत्राला चालना देण फार गरजेच होत. त्यातच मुंबईसह देश विदेशातील तरुणांची नोकरी गेल्यान ते बेरोजगार झाले होते ते गावी आले होते. अशावेळी त्यांचे हात शेतीकडे वळविण्यासाठी ‘कृषीक्रांती २०२०’ हे अभियान अनेक सामाजिक आणि सहकारी संस्थांना सोबत घेऊन हाती घेतल. प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन त्यांची यशोगाथा प्रसारित केली. कृषी अभ्यासक, कृषीतज्ञ आणि युवा शेतकरी यांच्यात सुसंवाद घडवून आणला. कोकणतील प्रमुख पिकांचे प्रगतशील शेतकरी ‘ब्रॅण्ड अँबेसीटर’ म्हणून जाहीर केलेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे आणि कोकणातील प्रगतशील शेतकरी आणि यांच्यात थेट लाईव्ह संवाद घडवून आणला. या शेतकऱ्यांनी आपल्या समस्या थेट कृषिमंत्र्याजवळ मांडल्यात. कोकणच्या शेतीला गती देण्यासाठी काय करावं लागेल हे इथल्या आंबा आणि काजू बागायतदारांनी थेट कृषी मंत्र्यांना थेट कृषी संवादामधून सांगितलं. कोकणच्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे जे काही शासन दरबारी करता येईल ते ते करु असं आश्वासन कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी शेतकऱ्यांना दिलेचं. पण त्याचबरोबर असा थेट किसान संवाद कोरोनाच्या कालावधीत घडवून आणला त्याबद्द्ल सिंधुदुर्ग लाईव्हचे विशेष धन्यवाद मानले.

कोव्हीडच्या कालावधीत रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी देखील डॉक्टर डे च्या दिवशी ‘थॅॅंक्यू डॉक्टर’ हा उपक्रम राबवत ‘डॉक्टर लाईव्ह’ हा एपिसोड सुरु केला. खरं तर, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला. त्यामुळे ‘स्मार्ट कोकणच डिजिटल एज्युकेशन’ या शैक्षणिक उपक्रमाची महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरुवात केली. या उपक्रमाअंतर्गत कोकणातील तज्ञ शिक्षकांना सोबत घेऊन शहरापासून खेड्या वस्तीत वसलेल्या मुलांसाठी सर्वप्रथम ‘ऑनलाईन वर्ग’ सुरु केलेत. त्याचा लाभ आज हजारो विद्यार्थी घेत आहेत.

कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला तो कोकणच्या लोककलेला. लॉकडावूनमुळे कलाकार घरी बसले होते. आपली कला ते रंगमंचावर सादर करु शकत नव्हते. साहजिकच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. कलेवर पोट असणाऱ्या दशावतार कलाकारांना,भजनी बुवांना आपली कला सादर सादर करण्यासाठी सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हने ‘डिजिटल प्लँटफॉर्म’ उपलब्ध करुन दिला. सिंधुदुर्ग दशावतार चालक-मालक संघटनेला सोबत घेऊन नामवंत दशावतार कलाकारांना एकत्र आणून एकापेक्षा एक असे ६ दशावतार नाट्यप्रयोग थेट लाईव्ह प्रक्षेपित केले. देश विदेशातील लाखो रसिकांनी सिंधुदुर्ग लाईव्ह च्या नेटवर्कवरुन या कलेचा मनमुराद आनंद घेतला आणि गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून दशावतार कलाकारांवर बक्षिसांचा वर्षाव केला. खरं कोकणच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीत सिंधुदुर्ग लाईव्हने राबविलेल्या हा पहिला डिजिटल प्रयोग होता आणि तो यशस्वी झाला. रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

दशावताराचे लाईव्ह नाट्यप्रयोग यशस्वी झाल्यामुळे कोकणच्या लोककलेची छान असणारी लोककला म्हणजे भजनबारी. कोकणातील नामवंत भजनी बुवांना सिंधुदुर्ग लाईव्हने सर्व प्रथम डिजिटल व्यासपीठ मिळवून दिलं. डबलबारीचे ६ लाईव्ह सामने, तिरंगी आणि चौरंगी बारीचा लाईव्ह सामना आयोजित केला. मुंबईसह देश विदेशातील लाखो भजन रसिकांनी बारीच्या या लाईव्ह सामान्यांना तुफान प्रतिसाद देत भजनी बुवांवर गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून बक्षिचांची अक्षरशः खैरात केली. लाईव्ह दशावतार नाट्यप्रयोग आणि लाईव्ह भजन बारीचे सामने आयोजित करुन कोकणच्या भूमीत ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ ने इतिहास तर रचला पण त्याचबरोबर उपासमारीची वेळ आलेल्या कलाकारांना कोरोनाच्या महामारीत डिजिटल रोजगार मिळवून दिला.

त्याच दरम्यान, कोकणची लोक परंपरा असणारी फुगडी लॉकडावूनमुळे सादर करता येत नव्हती. अनेक महिला कलाकार घरी बसून होत्या. अश्यावेळी दशावतार आणि भजनबारी प्रमाणे सिंधुदुर्ग लाईव्हने ‘लाईव्ह फुगडी महोत्सव’ आयोजित केला. महिलांना कलाकारांना डिजिटल व्यासपीठ मिळवून दिलेचं पण त्याबरोबर डिजिटल रोजगार पण उपलब्ध करुन दिला. एकूणच सिंधुदुर्ग लाईव्हने सर्व प्रथम कोरोनाच्या कालावधीत कोकणच्या लोककलेला आणि कलाकारांना जागतिक डिजिटल व्यासपीठ तर उपलब्ध करु दिलेच त्याचबरोबर कलाकारांना डिजिटल रोजगार उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांसह देश विदेशातील कोकणवासीयांनी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे विशेष करुन सागर चव्हाण यांचे धन्यवाद मानलेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना या सोहळ्याचे आमंत्रण देताना पुरस्काराचे आयोजक कल्यानजी जाना 

मात्र, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि टीम लीडर सागर चव्हाण एवढयावरच थांबले नाहीत तर ऑनलाईन अभंग गायन स्पर्धा, ‘मालवणी स्वाद’ ही ऑनलाइन रेसिपी स्पर्धा, आयपीएलच्या धर्तीवर ऑनलाइन ‘MyIPLStar’ ही ऑनलाइन स्पर्धा घेऊन कोकणवासीयांच्या कलागुणांना कोरोनासारख्या महामारीत जिवंत ठेवण्याचा यशस्वी प्रयन्त केला. एवढंच नव्हे तर कोरोनाच्या कालावधीत घरी बसून आलेला कंटाळा दूर करण्यासाठी तसेच मनाची मरगळ दूर करण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हने ‘सेलिब्रिटी लाईव्ह’ हा उपक्रम हाती घेतला. कोकणशी नाळ जोडलेल्या मराठी चित्रपट श्रुष्टीतील दिग्गज कलाकारांशी कोकणी जनतेचा थेट लाईव्ह संवाद घडवून आणला. तर कोकणच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कोकणचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री, अर्थतज्ज्ञ सुरेश प्रभू यांच्यासह अनेक तज्ञांच्या लाईव्ह मुलाखती प्रसारित केल्या. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असं सांगून अनेकांच्या जीवनात प्रकाशझोत निर्माण करणारे सदगुरु वामनराव पै यांचे शिष्य कोकणचे सुपुत्र शिवाजी पालव यांनी सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून ‘कोरोना आणि मन’ यावर अध्यात्मिक मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शनाचा लाभ मुंबईसह देश विदेशातील लोकांनी घेत मनाची मरगळ दूर केली.

कोव्हीडच्या या काळात एक क्षणही न थांबता अखंडपणे केलेल्या या सर्व उपक्रमांची, सिंधुदुर्ग लाईव्हच्या कार्याची दखल राज्यस्तरावर काम करणाऱ्या दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्मसकडून घेण्यात आली. या उल्लेखनीय कार्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्हचे एडिटर इन चीफ सागर चव्हाण यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोव्हीड योध्दा २०२०’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झालाय. या मानाच्या पुरस्कारामुळे निश्चितच सिंधुदुर्ग लाईव्हचं विशेष करुन सागर चव्हाण यांच सर्वच स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होतय.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.