युवा पिढीला निसर्गाकडे वळविण्याची गरज : रामेश्वर सावंत

0
224

सिंधुदुर्गनगरी, दि. ०१: सोशल मिडिया, सवंग करमणुक यांच्या आहारी गेलेल्या, काहीशी दिशाहीन झालेल्या युवा पिढीला खऱ्याखुऱ्या आनंदी, निरोगी जीवनाचे दर्शन घडवायचे असेल तर त्यांना पुन्हा निसर्गाकडे वळवले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक आणि सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष रामेश्वर सावंत यांनी नुकतेच कणकवली तालुक्यातील भैरवगड येथे केले होते.

सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबने भैरवगड या वनदुर्गावर दोन दिवसांची दुर्गभ्रमण मोहिम आयोजित केली होती. या मोहिमेत ३२ दुर्गप्रेमी सहभागी झाले होते. यात ज्येष्ठ गिर्यारोहक निनाद खोत, ‘घुंगुरकाठी-सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, कवयित्री डॉ. सई लळीत, पर्यावरण तज्ञ श्रीधर पेडणेकर, उभयचर प्राणी तज्ञ गुरु कदम, अक्षय दळवी, पक्षीतज्ञ प्रवीण सावंत, प्रथमेश माळकर, मोहिम नेता प्रतीक गुरव, हेमंत परब, चित्रकार अक्षय मेस्त्री आणि अन्य दुर्गप्रेमी उपस्थित होते. यात दहा महिलांचा समावेश होता.

मोहिमेच्या समारोपप्रसंगी भैरवगडावरील भैरव मंदिराच्या प्रांगणात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सतीश लळीत यांनी मोहिमेच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री. रामेश्वर सावंत यांचा शाल व ग्रंथभेट देऊन सत्कार केला, तेव्हा श्री. सावंत बोलत होते. या मोहिमेचे सर्व व्यवस्थापन कौशल्याने सांभाळणारे युवक प्रतीक गुरव व हेमंत परब यांचा सत्कार श्री. सावंत यांनी केला.

श्री. सावंत म्हणाले की, आजकालचे जीवन अतिशय धावपळीचे झाले आहे, तेवढेच ते कृत्रिम झाले आहे. माणूस निसर्गापासून दूर जात आहे. पर्यावरणाची आणि निसर्गाची हानी होत आहे. त्यातच सोशल मिडिया आणि अन्य करमणुकीच्या अतिरेकामुळे युवा पिढी एकांगी होत चालली आहे. त्यांच्यामध्ये नवचैतन्य जागविण्यासाठी इतिहासाची आवड लावणे, निसर्ग, पर्यावरण, साहसी खेळ यांची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठीच सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबने ही दुर्गमोहिम आयोजित केली होती. यापुढेही दुर्गभ्रमंतीबरोबरच, रॅपलिंग, जंगलभ्रमंती यासारखे उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सतीश लळीत म्हणाले की, कोरोनाच्या साथीमुळे व सततच्या टाळेबंदीमुळे घरकोंबडेपणा आला होता. आता प्रशासनाने नियम पाळून भ्रमंतीला परवानगी दिली आहे. या दुर्गभ्रमण मोहिमेमुळे सर्वच सहभागींना निसर्गाच्या अगदी जवळ जाण्याची संधी मिळाली. आजची युवा पिढी पटकन वैफल्यग्रस्त होते. डिप्रेशन हा शब्द आता अगदी सर्रास ऐकु येतो. अशा परिस्थितीत या मोहिमा महत्वाची कामगिरी बजावु शकतात. इतिहास, निसर्ग, जैवविविधता, पक्षीदर्शन, पर्यावरण, व्यायाम, परिसर ओळख अशा अनेक दृष्टींनी दुर्गभ्रमण व गिर्यारोहण मोहिमा उपयुक्त ठरतात. जिल्ह्यातील पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही अशी ठिकाणे प्रकाशात आणली पाहिजेत. दुर्दैवाने भैरवगड परिसर बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहे. पर्यावरण व निसर्गप्रेमींनी ही ओळख पुसण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

भ्रमंतीच्या पहिल्या दिवशी गडावरील ‘नागणीचे पाणी’ या ठिकाणी ट्रेक व पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेथे प्रवीण सावंत यांनी सह्याद्रीमधील जैवविविधतेची माहिती दिली. रात्री शेकोटीच्या कार्यक्रमात देशभक्तीपर गाणी, कविता, ऐतिहासिक घटनांची उजळणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी गडावर स्वच्छता मोहिम राबवून प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. लवकरच पुढील मोहिम जाहीर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.