जादूटोणा प्रकरणी मुंबईतून एकाला अटक

0
890
मालवण : जादूटोणा करण्यासाठी सुमारे २ लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू बाबा तुकाराम मेस्त्री ऊफ महेश पांचाळ याच्यासह अन्य चार संशयित आरोपींना आज येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार सायंकाळी उशिरा त्यांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे. तर याप्रकरणी दत्ताराम पांचाळ रा. चेंबूर मुंबई याला मुंबईतून काल अटक केली. अशी माहिती तपासिक पोलिस निरीक्षक एस. जी. शिंदे यांनी दिली. 
दरम्यान संशयित एका आरोपीकडून दहा हजार रुपये तसेच जादूटोणा करण्यासाठी वापरलेले साहित्य हस्तगत करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. 
कौटुंबिक कलह दूर करण्याबरोबर व्यवसायात यश मिळवून देण्यासाठी कृष्णा चव्हाण यांच्यासह अन्य सात जणांची फसवणूक करत २ लाख ३८ हजार रुपये लाटल्याप्रकरणी पोलिसांनी तुकाराम मेस्त्री ऊफ महेश पांचाळ या मुख्य संशयितासह शैलेंद्र मुरलीधर राजाध्यक्ष वय-५०, श्रीधर गुणाजी सर्पे वय-६०, विनायक राजाराम राऊळ वय-६५ तिन्ही रा. कसवण-कणकवली या तिघांना अटक करण्यात आली होती. तर काल प्रवीण दत्ताराम पांचाळ रा. चेंबूर मुंबई याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. त्याने फिर्यादी कृष्णा चव्हाण यांची मुलगी ममता हिच्याकडे पूजाविधी करण्यास मदत केली होती. देवगडचे पोलिस निरीक्षक एस. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जी. व्ही. वारंग, राजन पाटील, मिलिंद परब, मनोज पुजारे यांच्या पथकाने त्याला मुंबईतून ताब्यात घेतले. आज या सर्व संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली आहे. 
या प्रकरणातील संशयित आरोपी शैलेंद्र राजाध्यक्ष याच्याकडून दहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे तर अन्य ठिकाणाहून तुकाराम मेस्त्री याने केलेल्या जादूटोण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या प्रकरणी भोंदू बाबा तुकाराम मेस्त्री याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.