एसपीनी केला कणकवली पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार

0
728

कणकवली : दि. ०६ : फेब्रुवारी २०१९ मध्ये घडलेल्या विनयभंग आणि चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून गुन्हेगाराला शिक्षा ठोठावण्यासाठी भक्कम पुरावे गोळा केल्याबद्दल एसपी राजेंद्र दाभाडे यांनी कणकवली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी आणि सहकारी कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार केला.

महिलेला एसटी स्टँडकडे जाणारा जवळचा रस्ता दाखविण्याच्या बहाण्याने कणकवली शहरातील मराठा मंडळ रस्त्यालगत मधु सगु कोकरे याने महिलेचा विनयभंग करून महिलेचा मोबाईल आणि रोख रक्कम रु.१ हजार लंपास केली होती. या गुन्ह्याचा योग्य तपासकाम करून भक्कम पूरावे न्यायलयासमोर ठेवल्यामुळे आरोपी कोकरे याचा गुन्हा शाबीत झाला. आरोपी कोकरे याला जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षे सक्तमजुरी आणि विनयभंगाच्या गुन्ह्याखाली आरोपीला २ वर्षे सक्तमजुरी व ५०० रु दंडा ची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ७ दिवस शिक्षा सुनावली आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये हा गुन्हा घडला होता. घटनेनंतर पीडित महिला बेशुद्धावस्थेत होती. आरोपीची माहिती मिळण्यात अडचण येत होती. कणकवली पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही आरोपीच्या मागावर होते. मात्र आरोपी सापडून येत नव्हता. गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांनी कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात आणि आपल्या खबऱ्यांच्या माध्यमातून हा गुन्हा मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील मधु सगु कोकरे याने केल्याची खबर मिळवली होती.

तत्कालीन प्रोबेशनरी डीवायएसपी कविता फडतरे आणि पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनखाली एएसआय बापू खरात यांनी मोठ्या शिताफीने आरोपी मधु सगु कोकरे याच्या असरोंडी येथील राहत्या घरातून मुसक्या आवळल्या होत्या. ए एस आय बापू खरात यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल एसपी दाभाडे यांनी खरात यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत खरात यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आरोपीला अटक करून सबळ पुरावे मिळवून आरोपीचा गुन्हा शाबीत होण्यासाठी कणकवली पोलिसांनी अथक मेहनत घेतली होती. मालवण पोलीस ठाण्याचे विद्यमान पोलीस निरीक्षक तथा कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तत्कालीन एपीआय सोनू ओटवणेकर यांनी या गुन्ह्याचा प्राथमिक तपास केला होता.तर पुढील तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री पाटील यांनी केला होता. कणकवली पोलिसांच्या या सांघिक कामगिरीबद्दल एसपी राजेंद्र दाभाडे यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, एएसआय बापू खरात, हवालदार उत्तम पवार, पोलीस नाईक नजीर सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल वैभव कोळी, कॉन्स्टेबल राकेश कडुलकर, यांचा विशेष सत्कार केला.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.