लाजिरवाण्या पराभवाची परतफेड; भारत ८ गड्यांनी विजयी

0
194

मेलबर्न: बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ८ विकेटनी पराभव करून भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारताने अनेक विक्रम केलेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ८ विकेटनी विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा दुसऱ्या डावात ३६ धावांवर ऑल आउट झाला होता. त्यानंतर भारताने तो सामना ८ विकेटनी गमावला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात चार बदलासह भारतीय संघ मैदानात उतरला. प्रथम गोलंदाजांनी केलेली उत्तम कामगिरी त्यावर फलंदाजांनी मिळून दिलेली आघाडी आणि पुन्हा गोलंदाजांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारताने बॉक्सिंग डे कसोटीत आठ विकेटनी विजय साकारला.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांनी ६४ धावांची भर टाकली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २००वर संपुष्टात आल्याने भारताला विजयासाठी ७० धावांची गरज होती. विजयासाठीचे सोपे लक्ष्य पार करताना भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो पाच धावावर करून बाद झाला. त्यानंतर आलेला अनुभवी चेतेश्वपर पुजारा देखील लवकर बाद झाला. पुजाराला कमिन्सने ३ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर शुभमन गिल (नाबाद ३५) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद-२७) यांनी विजयासाठीची औपचारिकता पूर्ण केली.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने कालच्या ६ बाद १३६ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. कॅमरून ग्रीन आणि पॅट कमिन्स हे दोघे मैदानावर होते. पहिल्या काही ओव्हर भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडण्याचे खुप प्रयत्न केले पण त्याला यश मिळाले नाही. अखेर ९० षटकानंतर नव्या चेंडूने जसप्रीत बुमराहने भारताला ब्रेक मिळून दिला. त्याने पॅट कमिन्सला २२ धावांवर बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट घेतली. या दोघांनी ५७ धावांची भागिदारी केली. त्यानंतर पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दोन धक्के दिले. त्याने प्रथम कॅमरून ग्रीनला ४५ धावांवर माघारी पाठवले आणि मग नॅथन लायनला जडेजाकडे कॅच देण्यास भाग पडले. दुसऱ्या सत्राचा खेळ संपण्याआधी अश्विनने जोश हेजलवुडची बोल्ड काढली आणि ऑस्ट्रेलियाचा २०० धावांवर ऑल आउट केला.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.