‘अनदर राऊंड’च्या प्रीमियर शोने इफ्फिची होणार शानदार सुरुवात..!

0
135

नवी दिल्‍ली | ब्युरो न्यूज | दि. ०४ : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फीचा येत्या 16 जानेवारी 2021 पासून गोव्यात शुभारंभ होतोय. यासाठी शुभारंभाचा चित्रपट म्हणून प्रख्यात डॅनिश दिग्दर्शक थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘अनदर राऊंड’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. फ्रांन्समधील कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवलेल्या मॅड्स मिक्केलसनने अभिनयाने नटलेल्या हा चित्रपट यंदाच्या इफ्फीमधील मोठे आकर्षण ठरणार आहे. डेन्मार्ककडून हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेसाठीही पाठवण्यात आला आहे.

महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे, संदीप कुमार यांच्या ‘मेहरुन्नीसा’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर शो देखील महोत्सवादरम्यान होणार आहे. फारुख जाफर या कसलेल्या अभिनेत्याची भूमिका असलेल्या या चित्रपटात, एका स्त्रीच्या स्वप्नांची कथा रेखाटण्यात आली आहे.

कियोशी कुरोसावा यांचा ऐतिहासिक मनोरंजक चित्रपट ‘वाईफ ऑफ अ स्पाय’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता 24 जानेवारीला 2021 ला होणार आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, या जपानी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा सिल्व्हर लायन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

51 व्या इफ्फीचे गोव्यात 16 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच हा महोत्सव, अर्धा ऑनलाईन तर अर्धा प्रत्यक्ष स्वरूपात भरवला जात आहे. या महोत्सवात जगभरातील एकूण 224 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात 21 नॉन-फिचर (माहिती-लघुपट) आणि 26 फिचर फिल्म (कथापट ) दाखवले जातील.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.