मालवणातील कॉलेज युवतीची आत्महत्या

0
21015
मालवण :  शहरातील धुरीवाडा कन्याशाळे नजीक एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या कु. संजना उर्फ सोनाली संजय पेंडुरकर या (१९) वर्षीय कॉलेज युवतीने सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कु. संजना हिच्या आकस्मिक निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मालवण कन्याशाळेनजीक श्री संजय पेंडुरकर हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. श्री पेंडुरकर हे सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या सुवर्ण पेढीवर गेले होते. तर त्यांची पत्नी आणि कु संजना ही घरातच होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सौ. पेंडुरकर या दुकानावर गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसताना संजना हिने पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. कु. संजना हिने मृत्युला का कवटाळले याचे कारण अद्याप समजु शकले नाही.
कु. संजना ही रत्नागिरीच्या फिनोलेक्स तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रॉनिक शाखेत शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती. सुट्टीचा कालावधी असल्याने ती मालवणला वास्तव्यास  आली होती. कु संजना ही  मनमिळाऊ होती तर नवोदित गायिका म्हणुन तिने जिल्हाभरात नावलौकिक प्राप्त केला होता. संजना हिच्या आकस्मिक मृत्यूची माहिती मिळताच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, यतीन खोत, दिपा शिंदे, सुनीता जाधव, महेश गिरकर तसेच मालवणातील सुवर्णकारांनी  धाव घेतली. कु. संजना हिच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी असा परिवार आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.