कोविड बाधितांनाही ‘विशिष्ट वेळे’त करता येणार मतदान.!

0
131

मुंबई, दि. 13 : कोविड-१९ बाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती तसेच दोनवेळच्या तपासणीनंतरही शरीराचं तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना सुद्धा मतदान करता येणार आहे. मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचं काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी ३.०० पर्यंत मतदानाची वेळ असेल. कोविडबाधित नसलेले, परंतू प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी ७.३० पासून मतदान करता येईल, असं निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितलं.

मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचं तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतलं जाईल. ते कायम असल्याचं आढळल्यास मतदारास टोकन दिलं जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलावण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यांसह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या असल्याचंही मदान यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.