कणकवलीत अवैध वाळू वाहतुकीला मनसेचा दणका

0
993

कणकवली | प्रतिनिधी | दि. २१ : सिंधुदुर्गातील वाळूपट्ट्याचे लिलाव झाले नसतानाही बिनदिक्कतपणे जिल्ह्याबाहेर होणाऱ्या वाळू वाहतुकीला मनसेनं दणका दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव नजीक असलदे-तावडेवाडी इथं ४ ब्रास अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडून कणकवली तहसीलदारांच्या ताब्यात दिला आहे.

जिल्ह्याबाहेर होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीविरोधात मनसेनं मोहीम उघडली आहे. नांदगावनजीक असलदे-तावडेवाडी इथं २० जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता ट्रक क्र. ( एम एच – ०९ – सी व्ही – ३३३५ ) अवैध वाळू वाहतूक करताना आढळला. मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी हा ट्रक अडवला. वाळू वाहतुकीचा परवाना नसतानाही ट्रकमधून वाळू वाहतूक केली जात होती.

मनसे पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर नायब तहसीलदार राठोड, नांदगाव मंडळ अधिकारी जाधव आणि तलाठी घटनास्थळी हजर झाले. महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार या ट्रकमध्ये ४ ब्रास वाळू होती. बाजारभावानुसार वाळूची किंमत १६ हजार आहे.

हा ट्रक तहसिलदार कार्यालय आवारात आणला असून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार पवार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.