पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिकेचा पुन्हा सहभाग.?

0
128

वॉशिंग्टन, दि. २१ : अमेरिकन राष्ट्राध्यक्षच्या खुर्चीवर विराजमान होताच जो बायडेन यांनी महत्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केलीय. वातावरण बदलाशी लढण्यासाठी अंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची सर्वात मोठी घोषणा त्यांनी केली. या करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याचा ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय त्यांनी मागे घेतलाय. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बुधवारी अमेरिकेला पॅरिस हवामानबदलविषयक करारामध्ये पुन्हा सहभागी करुन घेण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कराराच्या माध्यमातून अमेरिका हवामानासंदर्भातील बदलांमुळे उद्भवणाऱ्या प्रश्नांना तोंड देणार असून आधी हे आम्ही कधीही केलेलं नाही, असं बायडेन यांचं म्हणणं होतं. याशिवाय बायडेन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले इतरही काही निर्णय रद्द केलेत.

बायडेन यांनी घेतलेले काही निर्णय खालीलप्रमाणे : 

– पॅरिस हवामानबदल करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी

– करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अध्यादेश जारी

– वर्णद्वेष संपवण्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय

– सर्वसामान्यांना जास्तीत जास्त प्रणामात आर्थिक मदत देण्यासंदर्भातील घोषणा

– अमेरिका आणि मॅक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा निर्णय रद्द करून या प्रकल्पाला पुरवण्यात येणारा निधी थांबवण्यात आला.

– जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सभासदांमधून अमेरिका बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्द करण्यात आलाय.

– ट्रम्प प्रशासनाने मुस्लीम आणि आफ्रिकन देशांवर घातलेली बंदी हटवण्यात आली.

– विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यास सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली. यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.