‘शिवाजी महाराज पुतळा’ प्रश्नी प्रजासत्ताक दिनी कणकवलीत संयुक्त बैठक

0
221

कणकवली | प्रतिनिधी | दि. 21 :  कणकवली येथील महामार्ग चौपदरीकरणात ​छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विस्थापित झाला. आमदार, खासदार, मंत्री यांनी याची पाहणी केली, आश्वासने दिली; मात्र त्याबाबत ठोस कोणतीच कार्यवाही झालेली नाही. येत्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून त्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लागावा व छत्रपतींचा पुतळा पुनर्स्थापित व्हावा, अशी मराठा समाजाची भूमिका व मागणी आहे; त्यामुळे येत्या ​२६ जानेवारी रोजी आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी व कणकवलीतील प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्रित आणत यासंदर्भात एकमत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती एसटी सावंत यांनी दिली.

कणकवली येथील मराठा मंडळ सभागृहात पत्रकार परिषदेत एस. टी. सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत लवु वारंग, भाई परब, बच्चू प्रभुगावकर , सुशील सावंत, सखाराम सपकाळ, अविनाश राणे, यश सावंत आदी उपस्थित होते.

एस .टी. सावंत पुढे म्हणाले, कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरण विस्थापित होत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतरित करण्याबाबत अनेकदा चर्चा झाली. मात्र त्याबाबत आतापर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नाही म्हणूनच मराठा समाजाला याप्रश्नी आता पुढाकार घ्यावा लागत आहे.  जगभरात ज्यांचा आदर्श घेतला जातो, ज्यांना राष्ट्रपुरुष मानले जाते अशा छत्रपतींचा पुतळा चौपदरीकरणात धूळ खात उड्डाणपुलाखाली असल्याची बाब खेदजनक आहे.याबाबत राजकीय लोकांकडून वेगवेगळ्या जागा सुचवण्यात आल्या व एकमेकांनी सुचवलेल्या जागांना विरोधही झाला. त्यामुळे आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबितच राहिला. या प्रश्नी सर्वांनी एकमत करत छत्रपतींच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्याची गरज आहे.

शिवाजी मित्रमंडळ यांनी पुतळ्याची जागा निश्चित करण्यासाठी पाठपुरावा केला.राजकीय नेत्यांनी दोन्ही बाजूला जागा सुचवली होती; परंतु दोन्ही बाजूला सरकारी जागा आहेत.उड्डाण फुलाचे काम पूर्ण होत आहे.त्यामुळे नाईलाजास्तव आज पुन्हा एकदा मागणी करावी लागली. गेली तीन वर्षे हा प्रश्न प्रलंबित असताना याबाबत ठोस कार्यवाही होत नाही. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती आहे निदान त्यापूर्वी तरी छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या दैवताच्या पुतळ्याबाबत निर्णय अपेक्षित आहे.

पुतळ्यासाठी सांस्कृतिक लौकीकाला साजेशी जागा निश्चित करावी. आमदार, खासदार, मंत्र्यांनी आश्वासने दिली; परंतू अद्याप हालचाल नाही,म्हणून ही दाद आम्ही मागत आहोत.सर्व राजकीय नेत्यानी हेवेदावे न ठेवता एकत्र यावे. महाराष्ट्रची अस्मिता आहे हे लक्षात घेऊन काम करावे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुन्हा रितसर स्थापना करावी.अशी मागणी एस.टी. सावंत यांनी केली आहे.

 

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.