यासाठी प्रकल्पग्रस्तांनी रोखलं अरुणा धरणाच्या पिचींगचे काम..!

0
352

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. ०२ : अरुणा मध्यम धरणाच्या पाण्याचा विसर्ग अचानक थांबविल्यामुळे प्रकल्प ग्रस्तांनी धरणाच्या पिचींगचे काम रोखले आहे. प्रकल्पग्रस्त आक्रमक होत कामाला विरोध केला आहे. प्रकल्पग्रस्तांची बुडीत घरे दिसू लागल्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबविला असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

आखवणे येथील अरुणा मध्यम प्रकल्पाची जानेवारी २०१९ घळभरणी करण्यात आली.घाईगडबडीत झालेल्या या घळभरणीनेमुळे आखवणे, भोम,नागपवाडी येथील अनेक घरे बुडीत क्षेत्रात गेली होती. जुलै महीन्यात धरणात पाणी साठविल्यामुळे ही सर्व घरे पाण्यात गेली होती. त्याचा योग्य मोबदला देखील मिळाला नव्हता. या घरांचा व स्थावर मालमत्तेचा पंचनामा व्हावा व योग्य मोबदला मिळवण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा गेल्या दोन वर्षापासून लढा सुरू आहे. जानेवारी महीन्यापासुन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. हा पाण्याचा विसर्ग असाच सुरू ठेवावा.ज्यामुळे बुडीत क्षेत्रात गेलेल्या त्या घरांचा पंचनामा करता येईल. अशा मागणीचे निवेदन काही दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्तांनी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना दिले होते.

पाण्याचा विसर्ग होऊ लागल्यामुळे पाण्यातील घरे दिसू लागली होती. आता या घरांचा पंचनामा होईल या अपेक्षेने प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र २ फेब्रुवारीपासून पाण्याचा विसर्ग अचानक थांबविण्यात आला. यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज धरणाच्या पिचींगचे काम थांबविले आहे. धरण क्षेत्रात बुडलेली घरे दिसू लागल्यामुळेच प्रशासन व ठेकेदाराकडून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

जोपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू केला जात नाही तोपर्यंत काम करण्यास देणार नसल्याचा पवित्रा प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत,सेक्रेटरी अजय नागप,उपाध्यक्ष पांडुरंग जाधव,राजा कांबळे, मुकेश कदम आदी प्रकल्पग्रस्तांनी हे काम बंद पाडले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.