शिवजयंतीचा गोव्यात जल्लोष ; महाराष्ट्र मंडळाची जय्यत तयारी ; समुद्रापार झेंडा फडकवणाऱ्या मराठी व्यक्तिवांचा होणार सन्मान

0
172

पणजी | दि. १६ : पणजी इथं महाराष्ट्र मंडळ गोवाच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या सेवा सन्मान अर्थात हिरोजी इंदुलकर स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे मेरी क्युरी शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात, ज्येष्ठ समुद्री शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोले, विद्रोही पांथस्थ प्रवीण मानकर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी दौलत हवलदार आणि नासा हनिवेल एज्युकेटर लीना बोकील यांचा समावेश आहे.  पणजीतील मिरामार येथील युथ होस्टेल वरच्या विशेष कार्यक्रमात 20 फेब्रुवारीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि कलरकोन व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश परब यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.

अस आहे संपूर्ण कार्यक्रमाचं स्वरूप

यंदा स्वराज्य संस्थापक, जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा 19 आणि 20 फेब्रुवारी या 2 दिवशी पणजीत साजरी होत आहे. 19 फेब्रुवारी रोजी पहाटे किल्ले फर्मागुडी इथं गोरखनाथ केरकर यांच्या हस्ते शिवज्योत प्रज्वलीत करून मिरामार पणजी येथे आणण्यात येईल. 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना आमोद पाटील यांच्या हस्ते अभिषेक पूजन आणि शिवगर्जना होईल. 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनाचे अनंत जोशी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी कोल्हापूरच्या शिवगर्जना प्राचीन युद्ध कला व प्रशिक्षण संस्थाचे संस्थापक संदीपसिंह सावंत उपस्थित असतील. यानंतर पर्वरीच्या जेसीआयच्या सहकार्याने मुले व महिलांसाठी रांगोळी, वक्तृत्व ,निबंध, चित्रकला आणि धावण्याच्या मैदानी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी दिवसभर डॉ. यशराज भुसनार आणि डॉ. अनिलकुमार वैद्य यांच्या सौजन्याने आयुर्वेदिक उपचार शिबिर आयोजन करण्यात आला आहे. तर डॉ. कविता सुर्लाकर यांचे दंतचिकित्सा शिबिर होईल. संध्याकाळी आफ्रिका आणि मध्य पूर्व आशियामध्ये कार्यरत असलेल्या विद्रोही पांथस्थ प्रवीण मानकर यांच्या उपस्थितीत परिसंवाद होईल. यावेळी नासा हनीवेल एज्युकेटर लीना बोकील या अंतराळ आणि नासाच्या विविध मोहिमेबद्दल मुलांशी संवाद साधतील.
20 फेब्रुवारी रोजी 4.30 वाजता मिरामार सर्कल ते युथ हॉस्टेल दरम्यान जगदंब ढोल पथकाच्या वादनाने छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक निघेल. सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथा सांगणारे शिव व्याख्यान होईल तर 6:30 वाजता वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरोजी इंदुलकर सेवा सन्मान पुरस्कारांचा वितरण होईल. 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी संस्कृती चे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांचा महोत्सव कार्यक्रम स्थळी आयोजित केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमामध्ये मास्कचा वापर अनिवार्य आहे. तर सॅनेटायझरची सोयही करण्यात आली आहे.

 

 

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.