गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा ; भाजपमध्ये जाण्याची शक्यता.

0
439

गुजरात : गुजरातमधील काँग्रेसचे वरिष्ठ आणि कोळी समाजाचे नेते तसेच आमदार कुंवरजी बावलिया यांनी आज आपल्या आमदारकीसह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बावलियायांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी आणि दोन मंत्र्यांची भेट घेतली. बावलिया हे राजकोट जिल्ह्यातील जसदन विधानसभा मतदार संघातून ६वेळा निवडून आले आहेत, त्यांनी आपला राजीनामा गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे सोपवला आहे. बावलिया २००९ साली राजकोट लोकसभेवर निवडून आले होते. कोळी समाजाचे मोठे नेते समजले जाणारे बावलिया २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाने सतत त्यांना दुर्लक्ष केल्याने ते नाराज होते. त्यांना पक्षात कुठलेच महत्त्वाचे पद दिले नाही. बावलिया सत्ताधारी पक्षात सामील होऊन त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी राजकोटचेच एक नेते व माजी आमदार इंद्रनील राजगुरू यांनीही वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करून राजीनामा दिला होता.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बावलिया सारख्या नेत्याने पक्षाला राम राम ठोकल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या सुत्रानुसार बावलिया यांनी राजीनामा देण्यापूर्वी राहूल गांधीना ईमेल केला होता. या ईमेल मध्ये त्यांनी पक्षाच्या कामकाजाबद्दल नाराजी आणि खदखद व्यक्त केली होती. “गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष जीतू वाघानी बावलियांना पक्षात समाविष्ट करून घेतील” अशी प्रतिक्रिया गुजरात भाजपचे प्रवक्ते भारत पंड्या यांनी दिली

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.