चर्मकार समाज उन्नती मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘ही’ मागणी

0
138

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी | दि. २४ : संत रविदास महाराज यांची तिथीनुसार येणारी दि.२७ फेब्रुवारी २०२१ रोजीची जयंती जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात प्रतिमा पूजन करून साजरी करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे कडे केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १४ जानेवारी २०२१ च्या शासन परिपत्रकान्वये सन २०२१ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. या परिपत्रकातील यादीत अनुक्रमांक १० वर संत रविदास महाराज यांची जयंती तिथीनुसार शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करावी असे निर्देश आहेत.

परंतु बहुतांश शासकीय व निमशासकीय कार्यालयात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नाही.तसेच बहुतांश कार्यालयात संत रविदास महाराज यांची प्रतिमाही उपलब्ध नसते ही खेदाची बाब आहे. गेल्यावर्षीही ही जयंती साजरी करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश असताना ही कार्यवाही बहुतांश कार्यालयातून झालेली नाही.
यावर्षीपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती शासन आदेशान्वये साजरी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आपले स्तरावरून स्पष्ट सूचना निर्गमित कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हासरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.